सासऱ्याला नाकारले; पण सून आणि जावयाला सत्ता दिली  - vijay Kolte group loses in Gram Panchayat elections; But daughter-in-law Rashmi Bagal and son-in-law Umesh Patil won | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

सासऱ्याला नाकारले; पण सून आणि जावयाला सत्ता दिली 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

कोलते यांना नाकारले असले तरी त्यांच्या सूनबाई आणि जावयाने मात्र ग्रामपंचायतमध्ये सत्ता मिळविली आहे. 

पुणे : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना पराभवाचा धक्का देत जमिनीवर आणले. अनेक मातब्बरांचे वर्षांनुवर्षाचे गड उद्‌ध्वस्त करत अगदी नवख्यांना संधी दिली. पण, काहींनी आपली सत्ता काठावर का होईना कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. 

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, कृषी व संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांनाही जनतेने नाकारत अनेक वर्षांची सत्ता उलथवून टाकली आहे. कोलते यांना नाकारले असले तरी त्यांच्या सूनबाई आणि जावयाने मात्र ग्रामपंचायतमध्ये सत्ता मिळविली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बडे प्रस्थ समजले जाणारे आणि अनेक वर्षे सत्तेच्या राजकारणात राहिलेले विजय कोलते यांची पुरंदर तालुक्‍यातील पिसर्वे ग्रामपंचायतमधील सत्ता जनतेने सुमारे 25 वर्षांनंतर संपुष्टात आणली आहे. तत्पूर्वीही ग्रामपंचायतीवर कोलते गटाचीच सत्ता होती. या निवडणुकीत कोलते यांचे केवळ पॅनेलच पडले नाही, तर गावकऱ्यांनी कोलते यांचे सख्खे बंधू सुरेश यांनाही स्वीकारले नाही. गेली 42 वर्षांपासून कोलते गटाच्या ताब्यात असलेली ही ग्रामपंचायत शिवसेना व कॉंग्रेसच्या लोकांनी एकत्रित येत हस्तगत केली. पिसर्वे ग्रामस्थांनी कोलते यांना नाकारले असले तरी जावई आणि सूनबाईंना मात्र गावकऱ्यांनी साथ दिली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा सोलापूर जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील हे विजय कोलते यांचे जावई. पाटील यांनी मोहोळ तालुक्‍यातील नरखेड ग्रामपंचायतीची सत्ता एकहाती जिंकली. ग्रामपंचायतीची सत्ता मिळविण्याबरोबरच "नोटा'ला सर्वाधिक मते मिळवून देत इतिहास घडविला. एका प्रभागात पाटील यांच्या पॅनेलच्या उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद झाला. त्यामुळे पाटील यांनी "नोटा'लाच आपला उमेदवार जाहीर करत "नोटा'लाच मतदान करण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांनीही त्यास प्रतिसाद तब्बल 431 मते नोटाच्या पारड्यात टाकत विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले. 

दुसरीकडे, कोलते यांच्या सूनबाई, बागल गटाच्या नेत्या रश्‍मी बागल यांनीही करमाळा तालुक्‍यातील मांगी ग्रामपंचायतीची 1985 पासून असलेली सत्ता काठावर का होईना कायम राखली आहे. कारण, ग्रामपंचायतीच्या नऊ जागांपैकी बागल गटाला यंदाच्या निवडणुकीत जेमतेम पाच जागांवर विजय मिळविता आला. या ठिकाणी आमदार संजय शिंदे आणि माजी आमदार नारायण पाटील गटाने एकत्र येत बागलांना कडवी झुंज दिली. 

वास्ताविक, रश्‍मी बागल यांचे वडील, माजी राज्यमंत्री (स्व.) दिगंबरमामा बागल ह्यांची राजकीय सुरुवात मांगी गावच्या सरपंचपदापासून झाली होती. ते 1985 मध्ये मांगीचे सरपंच झाले, त्यानंतर करमाळा पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, राज्यमंत्री पदापर्यंत गेले. त्यामुळे मांगी ग्रामपंचायतीवर 1985 पासून बागलांची सत्ता आहे. येथील ग्रामपंचायतीची 1985 ते 2015 पर्यंतची प्रत्येक निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, 2015 मध्ये आमदार संजय शिंदे समर्थकांनी बागल यांच्या विरोधात पॅनेल उभा केले. मात्र, विरोधकांना सर्व 9 जागांवरही अपयश आले होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही आमदार संजय शिंदे समर्थक सुजित बागल व नारायण पाटील समर्थक देवानंद बागल यांच्या पॅनेलला चार जागा मिळाल्या, तर पाच जागा बागल यांना मिळाल्या, केवळ एका मताने बहुमत बागल गटाकडे आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख