भाजप आमदार परिचारकांच्या भावाची शरद पवारांच्या कार्यक्रमाला हजेरी 

परिचारक यांनी पवारांच्या कार्यक्रमाला लावलेल्या हजेरीचे राजकीय वर्तुळात कुतुहल आहे.
Umesh Paricharak attends Sharad Pawar's program in Solapur
Umesh Paricharak attends Sharad Pawar's program in Solapur

मंगळवेढा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेली पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यास अद्याप अवधी असतानाच राजकीय नेतेमंडळींनी जनसंपर्कासाठी धावाधाव सुरू केली आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांचे बंधू उमेश परिचारक हे आज (ता. 13 फेब्रुवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने आगामी पोटनिवडणुकीच्या उमेदवारीबाबत पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. परिचारक यांनी पवारांच्या कार्यक्रमाला लावलेल्या हजेरीचे राजकीय वर्तुळात कुतुहल आहे. 

राज्यात नाट्यमय घडामोडी घडून शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर सत्तेचा गोडवा मिळावा; म्हणून भाजपवासी झालेले अनेक जण परतीच्या मार्गावर आहेत. त्याची सुरुवात पंढरपुरातून कल्याणराव काळे यांनी शरद पवारांची भेट घेत पवारांवर स्तुतीसुमने उधळत केली. 

कोवीडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सध्या मतदारसंघामध्ये दामाजी साखर कारखाना, पोटनिवडणुकीतील उमेदवार आणि इच्छुकांचा संपर्क याबाबतची चर्चा जोरात सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनीही आतापर्यंत पक्षाच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर दौऱ्यात भाजपचे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता, त्यामुळे भाजपच्या वर्तुळात खळबळ उडाली होती. 

प्रशांत परिचारक यांच्या हालचाली पाहून भाजपने सोलापूर जिल्हा कार्यकारिणीत आमदार परिचारक यांच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले होते. त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेतील गटनेता निवडीची जबाबदारीही परिचारक यांच्यावर भाजपने सोपवली होती, त्यामुळे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न भाजपकडून हरतऱ्हेने सुरू आहे. त्याची चर्चा थांबते न थांबते तोच परिचारकांच्या राजकारणाचे पडद्यामागील सूत्रधार तथा त्यांचे बंधू युटोपियन कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी आज शरद पवारांच्या सोलापूर दौऱ्यात लावलेली हजेरी लक्षवेधक ठरली आहे. 

उमेश परिचारक हे मंगळवेढा तालुक्‍यात युटोपियन साखर कारखान्याच्या माध्यमातून मुक्कामी आहेत. त्यामुळे साखर कारखानदारीत ऊस दर देण्यापासून कारखानदारी चालवण्यापर्यंत त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे कारखानदारीतील अभ्यास राजकीय पडद्यावर येणार का? याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

पंढरपुरात तीन आमदार एकत्र येऊन कृषि विधेयकाला पाठिंबा देत असताना उमेश परिचारक मात्र शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने मतदारसंघामध्ये चर्चेला उधाण आले आहे. मंगळवेढ्यात दामाजी कारखान्याची निवडणूक की पोटनिवडणूक आदी होणार याची चर्चा सुरू असली तरी परिचारकांच्या भेटीमुळे आता नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com