उद्धव ठाकरे आता माझे मित्र नाहीत : चंद्रकांत पाटील  - Uddhav Thackeray is no longer my friend: Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धव ठाकरे आता माझे मित्र नाहीत : चंद्रकांत पाटील 

भरत पचंगे 
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

शिवसेनेच्या स्वार्थी राजकारणामुळे महाआघाडी सत्तेत आली. पण, काळजी करु नका, हेही दिवस बदलतील

शिक्रापूर (जि. पुणे) : राजकारणात प्रत्येक पक्षात इनकमिंग-आउटगोईंग होत असते, ते सर्वांशी मैत्रीच्या निमित्ताने घडून येते. महाविकास आघाडीच्या सरकारमधीलही अनेक जण आजही माझे मित्र आहेत आणि अधूनमधून ते मला भेटतही असतात. मात्र, सत्तेसाठी तत्वांना तिलांजली देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता माझ्यासाठी मित्र नाहीत, असे सांगून शिवसेनेमुळे आपली सत्ता गेल्याचा राग अजूनही असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दाखवून दिले. 

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाटील यांनी माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर तालुक्‍यात संपर्क दौरा केला. जनता दलाचे दिवंगत नेते बाळासाहेब खैरे यांचे चिरंजीव भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रोहीत खैरे यांच्या घरी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. भाजपच्या काळातील मंजूर व सुरू केलेल्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेच्या स्वार्थी राजकारणामुळे महाआघाडी सत्तेत आली आणि भाजपच्या रस्ते विकासकामांना खिळ बसली. राज्यभरातील रस्त्यांची सध्या संपूर्णपणे दुरवस्था झाली. पण, काळजी करु नका, हेही दिवस बदलतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. 

या वेळी माजी आमदार बाबूराव पाचर्णे, माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद, ऍड.धर्मेंद्र खांडरे, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, किरण दगडे, शामआप्पा चकोर, वैजवंती चव्हाण, जयेश शिंदे, आबासाहेब सोनवणे, भगवानराव शेळके, राहुल गवारे, रोहीत खैरे व भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

याच वेळी शिवसेनेच्या सांगली जिल्हाप्रमुखास भाजपत घेण्याबाबतच्या घडामोडींची माहिती पत्रकारांनी पाटील यांना विचारताच त्यांनी सांगितले की, माझी सर्वच पक्षात मित्रमंडळी आहेत आणि तेच कारण पक्षप्रवेशांसाठी महत्त्वाचे ठरते. गेली अनेक वर्षे मैत्री असलेल्या शिवसेनेबद्दल चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे हे पूर्वी माझे मित्र होते. मात्र, सत्तेसाठी तत्वांना तिलांजली देण्याचा प्रकार वाईट आहे, त्यामुळे ते आता मित्र नसल्याचे चंद्रकांतदादांनी सांगितले. 

पाचर्णेंच्या पराभवाचे शल्य 
शिरुर-हवेली मतदार संघाला भाजप सरकारच्या काळात बांधकाम विभाग आणि पीएमआरडीएच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करुन दिला. इतर तालुक्‍यांच्या तुलनेत शिरुर-हवेली लाडाचा राहिला होता. मात्र, या मतदार संघातील भाजपचे उमेदवार बाबूराव पाचर्णे यांच्या पराभवाचे शल्य देवेंद्र फडणवीस यांनाही आहे, अशी कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख