पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी 68 टक्के मतदान; कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार? - The turnout for the Pandharpur by-election was 68 per cent | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी 68 टक्के मतदान; कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार?

भारत नागणे
शनिवार, 17 एप्रिल 2021

स्वाभिमानीचा फटका नेमका कोणाला बसणार, याविषयी आता चर्चा सुरू असली तरी सर्वच उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे.

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले. शनिवारी सायंकाळी 7 वाजता निवडणुकीच्या रिंगणातील 19 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत सुमारे 68 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.  विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत 71 टक्के मतदान झाले होते, त्या तुलनेत आज झालेल्या पोटनिवडणुकीत 3 टक्के मतदान कमी झाले आहे.

पंढरपूरचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधना नंतर रिक्त झालेल्या जागेवर आज आज पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यात अटीतटीची लढत झाली असली तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील व अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांनी ही आपली शक्ती पणाला लावली होती. स्वाभिमानीचा फटका नेमका कोणाला बसणार, याविषयी आता चर्चा सुरू असली तरी सर्वच उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे.

भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी आज सकाळी 7.30 वाजता मंगळवेढा येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील मतदान केंद्रावर, तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांनी पंढरपूर येथील नगरपालिकेच्या सात नंबर शाळेतील मतदान केंद्रावर सहकुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील व अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना मात्र मतदानाचा अधिकार नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही.

पंढरपूरची पोटनिवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपने प्रतिष्ठेची  केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक मंत्री आणि आमदार भालके यांच्या प्रचारात उतरले होते. भाजपकडून माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पक्षनिरीक्षक बाळा भेगडे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आवताडेंच्या विजयासाठी मोठी ताकद लावली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने 524 मतदान केंद्रांची व्यवस्था केली होती. या सर्व  केंद्रावर सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत मतदान घेण्यात आले. सकाळ ७ पासूनच मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते. मतदानादरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
  
निवडणुक आयोगाने प्रथमच 80 वर्षावरील व दिव्यांग मतदारांना टपाली मतदानाची सोय करून दिली होती. शुक्रवारअखेर 13 हजारांपैकी सुमारे 3 हजार मतदारांनी टपाली मतदान केले होते. येत्या दोन मे रोजी होणाऱ्या मतमोजणीत कोण बाजी मारणार, याकडेच संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख