राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष साठे म्हणतात, कोठेंचा पक्षप्रवेश झाला. पण... 

कोठे यांना पक्षात घेण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
Solapur district president Baliram Sathe's explanation on Mahesh Kothe's NCP entry
Solapur district president Baliram Sathe's explanation on Mahesh Kothe's NCP entry

सोलापूर : "शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, शिवसेना नाराज होईल; म्हणून राष्ट्रवादीने त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिलेले नाही. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय होणार आहे. तत्पूर्वी, कोठे यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला असून, त्याबाबतची अधिकृत घोषणा फक्त राहिली आहे,'' असे राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनी सांगितले. 


सोलापूर महापालिकेत हाताच्या बोटावर असलेली संख्या वाढविण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यादृष्टीने पावले टाकत एमआयएमचे तौफीक शेख यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. त्यानंतर शहरात बऱ्यापैकी वर्चस्व राखून असलेले महेश कोठे यांना राष्ट्रवादीत आणण्याचा स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले.

शिवाय, शिवसेनेकडून डावलण्यात येत असलेले कोठे यांनाही आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या पक्षाची गरज होती. त्यातूनच त्यांनी "शहर उत्तर' मतदारसंघाचे गणित डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे ठरविले. पण, शिवसेनेच्या दबावामुळे कोठे वगळता त्यांच्या समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता जिल्हाध्यक्ष साठे यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा कोठे यांच्या प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 


अजित पवारांचे ते वक्तव्यं 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात कोठे यांच्याबाबत वेगळेच वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, कोठे हे अनेक दिवसांपासून अस्वस्थ आहे. राष्ट्रवादी प्रवेशासाठी ते इच्छुक आहेत. पण, एकमेकांच्या पक्षातील नेते कोणी कोणाच्या पक्षात घ्यायचे नाहीत, असं आमचं (महाविकास आघाडीतील पक्ष) ठरलं आहे. त्यामुळे कोठे यांची कोंडी झाली होती. 

पवारांनीच निर्णय घेतला 

कोठे यांची ताकद पाहता राष्ट्रवादी ही संधी गमावणार नाही. त्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रवेश दिला आहे. त्याची अधिकृत घोषणा लवकरच होईल, असेही साठे यांनी सांगितले. कोठे यांच्यासारखा ताकदवान नेता राष्ट्रवादीत आल्याने शहरातील ताकद वाढणार आहे. शहर उत्तर या मतदारसंघातही राष्ट्रवादी मजबूत होणार आहे, असा दावाही साठे यांनी केला. शिवाय, कोठे यांना पक्षात घेण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. 

किती नगरसेवक शिवसेना सोडणार? 

शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने महेश कोठे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केली. त्यानंतरही महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद कोठे यांच्याकडेच ठेवण्यात आले होते. शिवसेनेत अस्वस्थ असलेले कोठे यांनी विरोधी पक्षनेतेपद अमोल शिंदे यांच्याकडे सोपवून त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा अनौपचारिक प्रवेश झाला. मात्र, त्यांच्यासोबत किती नगरसेवक शिवसेना पक्ष सोडतील, याची उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com