सिंधुदुर्ग : ''नारायण राणे आणि नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गिफ्ट देण्याची कुवत आज तरी राहीलेली नाही. त्यांनी कितीही गिफ्ट देऊ केली तरी शिवसेनेला त्याची गरज नाही. शिवसेना पक्षप्रमुखांनी आपल्या मनाचा मोठेपणा किती आहे तो दाखवून दिला. तुम्ही शिवसेनेशी बेईमानी केली तरी तुमच्या मेडीकल काॅलेजचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच मंजूर केला., दुसऱ्या कोणी केला नाही. त्यामुळे नितेश राणेंकडून गिफ्ट स्विकारण्याची वेळ शिवसेनेवर आज तरी आलेली नाही. माञ नितेश राणे यांच्यावर ती वेळ लवकरच येणार आहे,'' असा हल्लाबोल शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
''वैभववाडीचे काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची बातमी वाचली आहे, व्हॅलेंटाईन डे काही दिवसांवर आहे आणि शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे, जुन्या प्रेमाला कधी विसरायचं नसतं असं सगळेच म्हणतात. वैभववाडीची सध्या परिस्थिती पाहिली तर शिवसेनेकडे मूळ शिवसैनिक सापडणार नाही. शिवसेना पक्ष हा हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, बाळासाहेब ठाकरेंवर आमचं नितांत प्रेम आहे, त्यामुळे शिवसेना पक्षाची अशी अवस्था होऊ नेय, अशी माझ्यासारख्या बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या कुटुंबाची भावना आहे. म्हणून हे ७ नगरसेवक व्हॅलेंटाईन डे निमित्त उद्धव ठाकरेंकडे पाठवतोय'' असे काल नितेश राणे म्हणाले होते. त्याला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
''राणेंची थोडीतरी लाज राखावी या मोठेपणाने आम्ही भाजप नगरसेवकांचा प्रवेश दोन दिवस पुढे ढकलला. नाहीतर अमित शहा ज्या दिवशी सिंधुदुर्गात आले त्याच दिवशी हा धक्का आम्ही देऊ शकत होतो. वैभववाडीच्या ज्या नगरसवकांनी प्रवेश केला. ते नितेश राणेंच्या हटवादी पणाला कंटाळून सेनेत प्रवेश करतायत अजूनही जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी शिवसेनेत येतील आणि त्याला कारण यांची दादागिरी हटवादीपणा कारणीभूत आहे,'' असे राऊत म्हणाले.
''निलेश राणेंच्या या बकवास गिरीला कोकणातील जनतेने एकदा नाही तर दोनदा धडा शिकवला आहे ही त्यांची मारामारीची, अरेरावीची, शिविगाळीची, हाणामारीची भाषा निलेश राणेंनाच शोभते इतर कोणाला शोभत नाही. कोकणवासीय सुज्ञ आहे त्यांना पुन्हा एकदा धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. शातील लाखो शेतकरी तीथे आक्रोश आंदोलन करत असताना दुर्दैवाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची निर्भत्सना केली आहे. आंदोलनजीवी म्हणून जर तुम्ही त्यांची थट्टा करत असाल, तर हाच देशातील शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही,'' असेही राऊत म्हणाले.
Edited by - Amit Golwalkar

