सरपंच निवडीचा घोडेबाजार तेजीत : हाणामारी झालेले दोन गट सत्तेसाठी एकत्र !  - Rapid developments in Mangalwedha taluka for election of Sarpanch | Politics Marathi News - Sarkarnama

सरपंच निवडीचा घोडेबाजार तेजीत : हाणामारी झालेले दोन गट सत्तेसाठी एकत्र ! 

हुकूम मुलाणी 
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या आगामी पोटनिवडणुकीमुळे तालुक्‍यातील नेत्यांनी गावपातळीवरील नेत्यांना ताकद दिली आहे.

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्‍यातील सरपंचपदाच्या निवडी एकाच दिवशी म्हणजे येत्या 11 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी फोडाफोडीच्या हालचालींनी वेग घेतला आहे. त्यामध्ये नंदेश्‍वर येथे निवडणुकीत हाणमारी झालेले दोन गट सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले आहेत. येथील सत्ताधारी गटाने विरोधी गटाचे तीन सदस्य अज्ञातस्थळी नेल्यामुळे सरपंच व उपसरपंच कोणत्या गटाचा होणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. 

नुकत्याच झालेल्या मंगळवेढा तालुक्‍यातील 22 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काठावर सत्ता मिळवलेल्या सिद्धापूर, लवंगी, आसबेवाडी, बालाजीनगर, नंदेश्‍वर, डोणज, अरळी या गावांत सत्ता एका सदस्याच्या फरकामुळे मिळाली आहे. अरळी येथे तर चिठ्ठीद्वारे सदस्य व सत्ता मिळाली, तर बालाजी नगर येथे समसमान मते पडली आणि चिठ्ठीमुळे एका गटाला सत्ता गमवावी लागली, त्यामुळे काठावर बहुमत मिळालेल्या गावांत सत्तेसाठी विविध अस्त्रांचा वापर करण्यात येत आहे. 

गणेशवाडीचे सरपंचपद रिक्त राहणार आहे. माचणूर, मरवडे, भोसे, लेंडवेचिंचाळे, बोराळे, हुलजंती, सलगर बुद्रूक, कर्जाळ कात्राळ, तांडोर, या गावांत बहुमत मोठे मिळाल्याने स्थानिक नेत्यांनी ठरवेल त्याला संधी मिळणार आहे, त्यामुळे या गावांत राजकीय घोडेबाजार होणार नाही. तरीही सत्ताधारी गटाकडून सावध पावित्रा घेतला जात आहे. 

तीर्थक्षेत्र विकास निधी, 14 व 15 व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर आल्यामुळे ग्रामपंचायती मालामाल झाल्या आहेत. त्यामुळे विकासकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्याने जिल्हा पातळीवरील नेत्यांनीही ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातल्याने राजकीय चुरस वाढली आहे. 

दरम्यान, आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या आगामी पोटनिवडणुकीमुळे तालुक्‍यातील राजकीय नेत्यांनी गावपातळीवरील नेत्यांना ताकद दिली आहे. त्यामुळे सरपंच निवड होईपर्यत राजकीय हालचाली निर्णायक वळणावर आहेत. 

नंदेश्‍वर ग्रामपंचायात निवडणुकीतील विजयाचा गुलाल बाजूला होण्यापूर्वीच सर्व सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. या ठिकाणी एका गटाने सात जागा मिळविल्या होत्या, दुसऱ्या गटाला सहा जागा मिळाल्या होत्या. या सहा जागा मिळालेल्या पॅनेलमध्ये दोन गट होते. त्यातील एका गटाने बहुमत मिळालेल्या गटातील उमेदवार फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते खेळी त्यांच्या अंगलट आली. कारण, बहुमत असणाऱ्या गटाने विरोधी गटातील तीन सदस्यांना जवळ करत अज्ञात स्थळी रवाना केले आहे. त्यामुळे सरपंच कोण होणार? आणि तीन सदस्यांच्या गटाला उपसरपंचपद मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे नेमका गुलाल कोण उधळणार, हे मात्र निवडीदिवशीच बघायला मिळणार आहे. 

सध्या सरपंच निवडीच्या निमित्ताने अनेक राजकीय नेत्यांनी भविष्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची राजकीय गणिते जुळविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख