सांगलीचे पाटील ठरले कोल्हापूरच्या पाटलांना भारी 

सत्ता हाती नसल्याने गेल्या पाच वर्षांत जेवढी ताकद फोडाफाडीच्या माध्यमातून गोळा करता आली, तेवढी सत्ता नसल्याने मिळू शकली नाही.
Patil of Sangli became heavy to Patils of Kolhapur
Patil of Sangli became heavy to Patils of Kolhapur

पुणे : भारतीय जनता पक्षाचा पारंपारिक बालेकिल्ला असलेल्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात विजय मिळवत महाविकास आघाडीने ऐकीचे बळ दाखवून दिले. या मतदारसंघातील विशेषतः पदवीधरध्ये अरुण लाड आणि संग्राम देशमुख उमेदवार असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातच खरी लढत होती. त्यात सांगलीचे पाटील हे कोल्हापूरच्या पाटलांना भारी ठरल्याचे निवडणूक निकालावरून दिसून आले. 

तिकिट मिळविण्यापासून मतदानापर्यंतची कोणताही गाजावाजा न करता करण्यात आलेली जयंत पाटील यांची व्यूहरचना कमालीची यशस्वी ठरली. त्याला महाविकास आघाडीतील शिवसेना आणि कॉंग्रेसचीही तेवढीच तोलामोलाची साथ लाभली. 

सांगलीचे अरुण लाड यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यापासून त्यांना निवडून आणण्यापर्यंत जयंत पाटील यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. कारण, पक्षाच्या उमेदवारीसाठी सोलापूरचे उमेश पाटील, श्रीमंत कोकाटे, पुण्याच्या नीता ढमाले, तसेच कोल्हापूरचे भैया माने हे तीव्र इच्छुक होते. पण, या सर्वांमधून लाड यांना तिकिट मिळवून देत जयंत पाटील यांनी सांगलीला आणखी एक आमदार मिळवून देण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. 

दुसरीकडे, चंद्रकांत पाटील यांनीही सांगलीचे संग्राम देशमुख यांच्या गळ्यात भाजपच्या उमेदवारीची माळ घालत त्यांच्या विजयासाठी प्रयत्न सुरू केले. चंद्रकांतदादा कोल्हापूरचे असले तरी ते पुण्याच्या कोथरूडमधून निवडून आलेले आहेत. त्यामुळे पुण्यात संपर्क वाढत त्यांनी पदवीधरांची नोंदणी मोठ्या प्रमाणात करून घेतली होती. तसेच, गेल्या दोन निवडणुकीतील अनुभव लक्षात घेऊन त्यांना "पदवीधर'मधून विजयाची खात्री होती. मात्र, जयंत पाटलांनी त्यांचा प्रत्येक डाव ओळखून प्रतिडाव टाकत प्रचारयंत्रणा राबवली. 

सांगलीत चंद्रकांत पाटलांनी ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्याला आपल्याकडे खेचून काही प्रमाणात फोडाफोडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्ता हाती नसल्याने गेल्या पाच वर्षांत जेवढी ताकद फोडाफाडीच्या माध्यमातून गोळा करता आली, तेवढी सत्ता नसल्याने मिळू शकली नाही. याउलट जयंत पाटलांनी मात्र सांगलीत विश्‍वजीत कदम यांच्याशी जुळवून घेत भाजपतील नेत्यांशी असलेल्या संबंधाचा फायदा करून घेतल्याचे दिसते. 

प्रचाराच्या काळात चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांना इस्लामपूरमध्ये हरवण्याची भाषा केली. पुढच्या निवडणुकीत मीच सांगलीत तळ ठोकून थांबतो आणि जयंतराव कसे निवडून येतात ते पाहतो, असे आव्हान दिले होते. तसेच, महापालिकांत सत्ता असलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, सांगली या शहरांतही चंद्रकांतदादांनी जोर लावला होता. कारण, ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरची पहिलीच मोठी निवडणूक होती. तसेच, पुणे पदवीधरची जागा स्वतःची असल्याने प्रतिष्ठा पणाला लावत त्यांनी ती राखण्यासाठी जोर लावला होता. मात्र, त्यांच्या पदरी निराशा पडली. 

दुसरीकडे, इस्लामपूरमध्ये हरविण्याची भाषा करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना व्यक्तीगत पातळीवर उत्तर न देता जयंत पाटील यांनी व्यूहरचना आखत त्यानुसार प्रचार केला. अगदी विश्‍वजित कदमांपासून सतेज पाटील आणि सोलापूरच्या संजय शिंदेंपासून साताऱ्यातील शशिकांत शिंदे यांच्या मदतीतून पुणे मतदारसंघात काहींसा अवघड वाटणारा विजय जयंत पाटील यांनी साकारला आणि सांगलीला लाड यांच्या रुपाने आणखी एक आमदार मिळवून दिला. 

त्या चुकीची चंद्रकांतदादांकडून पुनरावृत्ती

विधानसभा निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी "आमचे पहिलवान तेल लावून आखाड्यात तयार आहेत. मात्र, आम्हाला पुढे पहिलवानच दिसत नाही,' अशी भाषा वापरत विरोधकांना किरकोळीत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी त्यांना प्रत्युत्तर देत 54 जागा जिंकल्या होत्या. आताही पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनीही शरद पवार हे छोटे नेते आहेत, असे वक्तव्य केले होते. त्यावरून टीका झाल्याने चंद्रकांतदादांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. त्यातून निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा राष्ट्रवादीलाच झाला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com