राष्ट्रवादीकडून चर्चेत असलेले प्रा. भिंगे म्हणतात, 'बायोडाटा मागवून घेतला; पण...'  - Nationalist Congress called for biodata; But ...: Pvt. Yashpal Bhinge | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

राष्ट्रवादीकडून चर्चेत असलेले प्रा. भिंगे म्हणतात, 'बायोडाटा मागवून घेतला; पण...' 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

धनगर समाजाचा चेहरा म्हणून प्रा. भिंगे यांची ओळख आहे.

नांदेड : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाने आपल्याकडून बायोडाटा मागवून घेतला आहे, यात दुमत नाही. पण, विधान परिषदेवर मला संधी मिळेल की नाही, याबद्दल निश्‍चित सांगता येणार नाही. संधी मिळाल्यास चांगले काम करून दाखवू, असा विश्‍वास राष्ट्रवादीकडून विधान परिषद सदस्यत्वासाठी पाठविण्यात आलेल्या नावाची चर्चा असलेल्या नांदेड येथील प्रा. यशपाल भिंगे यांनी व्यक्त केला. 

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त बारा जागांसाठी सध्या महाआघाडीकडून नावे अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून वंचित बहुजन आघाडीकडून गत लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले नांदेडचे प्रा. भिंगे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. धनगर समाजाचा चेहरा म्हणून प्रा. भिंगे यांची ओळख असून त्यांच्याकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसने बायोडाटा मागविला आहे. त्यामुळे त्यांना आमदारकी मिळण्याची शक्‍यता आहे. 

महाआघाडीतर्फे कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वतीने प्रत्येकी चार याप्रमाणे बारा नावे देण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात मंत्रिमंडळातर्फे चर्चा सुरू आहे. दरम्यान, नांदेडमधून प्रा. भिंगे यांचा राष्ट्रवादीने बायोडाटा मागवून घेतल्याने त्यांच्या नावाची चर्चा आहे. 

धनगर समाजाची लोकसंख्या पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केवळ एकच आमदार निवडून आला आहे. त्यामुळे समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे. धनगर समाजाचे अभ्यासू प्राध्यापक व तरुण नेतृत्व म्हणून प्रा. भिंगे यांच्याकडे पाहिले जात आहे.

ते राजकारणात नवखे असले तरी, त्यांचा समाजाविषयाचा तसेच इंग्रजीचा दांडगा अभ्यास आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून प्रा. भिंगे यांच्या रूपाने नवीन, अभ्यासू चेहऱ्याला विधान परिषदेसाठी संधी मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख