करमाळ्यात पाटील - बागल गट आले एकत्र; शिंदेंची जगतापांबरोबर युती 

काही ग्रामपंचायतीत पाटील-बागल-शिंदे-जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी सोयीनुसार एकत्र येत पॅनेल उभे केले आहेत.
Narayan Patil-Rashmi Bagal group came together for Gram Panchayat elections in Karmala
Narayan Patil-Rashmi Bagal group came together for Gram Panchayat elections in Karmala

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यात मांगी, पोथरे, देवळाली, झरे, सावडी, साडे, जातेगांव, कुंभेज, गुळसडी या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कायम एकमेकांच्या विरोधात लढणारे माजी आमदार नारायण पाटील यांचा गट आणि बागल गट हे बहुसंख्य ठिकाणी एकत्र आले आहेत.

तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून एकत्र आलेले आमदार संजय शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या गटांनीही युती केली आहे. हे चित्र अपवादात्मक ग्रामपंचायती वगळता सर्वत्र दिसून येत आहे. तर काही ग्रामपंचायतीत पाटील-बागल-शिंदे-जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी सोयीनुसार एकत्र येत पॅनेल उभे केले आहेत. 

करमाळा तालुक्‍यात अनेक ग्रामपंचायतींवर पाटील, बागल, जगताप यांची सत्ता आहे. शिंदे गटाने 2014 पासून तालुक्‍यात प्रवेश केला आहे. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत संजय शिंदे आमदार झाल्यापासून त्यांच्या गटाच्या नावाने निवडणुका लढवण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत असून या निवडणुकीमध्ये त्याला यश आले आहे. 

देवळाली ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण पाटील यांची सत्ता आहे. येथे अनेक वर्ष बागल गटाची सत्ता होती. याही वेळी बागल विरुध्द पाटील असा थेट सामना होत असून जगताप व शिंदे यांचे कार्यकर्ते सोयीनुसार भूमिका घेऊन निवडणुकीत उतरले आहेत. पंचायत समितीचे विद्यमान सभापती गहिनीनाथ ननवरे हे या निवडणुकीत सक्रिय आहेत, तर माजी सभापती (कै.) कल्याण गायकवाड यांचे चिरंजीव अशिष गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील बागल गटाकडून निवडणूक लढवली जात आहे 

मांगी ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षांपासून बागल गटाचे वर्चस्व आहे. येथे माजी राज्यमंजी (कै.) दिगंबर बागल यांच्यापासून बागल गटाची एकहाती सत्ता आहे. मात्र, या निवडणुकीत आमदार शिंदे गटाने बागल यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. आमदार शिंदे गटाचे सुजित बागल यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने येथे मोठी ताकद लावली आहे. 

पश्‍चिम भागातील सावडी ग्रामपंचायतीची निवडणुक अटीतटीची होत आहे. सध्या येथे बागल व पाटील गटाची सत्ता आहे. सावडीत बागल-पाटील विरुद्ध शिंदे गट अशी निवडणूक होत आहे. माजी सरपंच काशिनाथ काकडे, माजी आमदार नारायण पाटील समर्थक उपसरपंच महादेव श्रीखंडे यांच्या नेतृत्वाखालील पाटील-बागल गट विरूध्द माजी सरपंच सतीश शेळके यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट अशी ही निवडणूक होत आहे. पाटील गटाचे काही कार्यकर्ते सतीश शेळके यांच्याबरोबर काम करत आहेत. 

साडे ग्रामपंचायत निवडणुकीतही मोठी चुरस पहायला मिळत आहे. या निवडणुकीत माजी सरपंच दत्ता जाधव हे शिंदे गटाचे नेतृत्व करत आहेत. येथे शिंदे-जगताप विरूध्द पाटील-बागल असा सामना होत आहे. या गावात माजी आमदार नारायण पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. 

झरे ग्रामपंचायतीने या वेळी सर्वांचे लक्ष वेधले आहे. येथे विधानसभा निवडणुकीला माजी आमदार पाटील यांना मोठे मताधिक्‍य मिळेल होते. या ग्रामपंचायतीवर पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास पाटील यांचे कायम वर्चस्व राहिले आहे. विलास पाटील यांचे नातू प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील ही निवडणूक लढवली जात आहे.

पाटील यांची सत्ता घालण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब गुळवे, नारायण अंब्रुळे, शेतकरी बाळासाहेब गायकवाड, विलास चौधरी हे एकत्र आले आहेत. त्यांनी स्थानिक पातळीवर गट तट विसरून जोतिर्लिंग ग्राम विकास पॅनेल तयार करून ही निवडणूक लढवत आहेत. प्रशांत पाटील यांनी तरूणांची फळी जवळ करत उमेदवारीत त्यांना प्राधान्य दिले आहे. 

गुळसडीत पाटील-बागल-शिंदे-जगताप यांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी 9 उमेदवारही ठरविण्यात आले. मात्र, शेवटच्या दोन दिवसांत आमदार संजय शिंदे समर्थक युवा नेते शिवाजी पाटील यांनी आम्हाला विचारात न घेता सर्व चालले आहे; म्हणून पॅनेल उभा केला. त्यामुळे येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष (कै.) नारायण खंडागळे यांच्या पत्नी सिंधू खंडागळे यांची एकच जागा बिनविरोध झाली. बाकी 8 जागांवर निवडणूक लागली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com