खासदार निंबाळकर हे भाजप नेत्यांचा कोणता निरोप घेऊन कल्याण काळेंना भेटले - MP Ranjit Singh Nimbalkar meet Kalyan Kale who is on the path of NCP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

खासदार निंबाळकर हे भाजप नेत्यांचा कोणता निरोप घेऊन कल्याण काळेंना भेटले

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 एप्रिल 2021

तत्पूर्वी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राष्ट्रवादी प्रवेशामागील कारण त्यांना सांगितल्याची चर्चा आहे.

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते कल्याण काळे यांची सोमवारी (ता. ५ एप्रिल) माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेटी घेतली. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेटी महत्वाची मानली जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा कोणता मेसेज घेऊन खासदार निंबाळकर हे काळे यांना भेटले, अशी चर्चा या भेटीच्या निमित्ताने होत आहे.   

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त गेल्या दोन दिवसांपासून येत आहे. एकीकडे काळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या बातम्या येत असताना माढा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोमवारी कल्याण काळे यांची पंढरपुरात येऊन भेट घेतली. 

काळे यांच्या संपर्क कार्यालयात या दोघांमध्ये भेट होऊन चर्चा झाली. चर्चेचा तपशील मिळू शकला नसला तरी काळे यांच्या भाजप सोडण्यावर मात्र नक्की चर्चा झाली असणार. काळे यांनी भारतीय जनता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने पक्षासाठी तो एक मोठा धक्का समजला जात आहे. पोटनिवडणूक सुरू असताना असा धक्का पक्षाला बसू नये, यासाठी भाजपच्या कोणत्या वरिष्ठ नेत्यांचा मेसेज घेऊन माढ्याचे खासदार काळे यांच्या भेटीला आले होते, असा सवाल राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. 

दरम्यान, कल्याण काळे यांनी शनिवारी (ता. ३ एप्रिल) आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांची मते जाणून घेतली होती. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी पंढरपूर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत स्नेहभोजन घेतले होते. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला दुजोरा मिळत होता.

जयंत पाटील यांच्या भेटीनंतर कल्याण काळे यांनी दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. ते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. तत्पूर्वी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राष्ट्रवादी प्रवेशामागील कारण त्यांना सांगितल्याची चर्चा आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात ‘सरकारनामा’शी बोलताना कल्याण काळे यांनी येत्या दोन दिवसांत प्रवेशाबाबतचा निर्णय होणार आहे, असे सांगितले. त्यामुळे आता खासदार निंबाळकर हे कोणत्या भाजप नेत्याचा काय निरोप घेऊन काळे यांना भेटले आणि काळे याबाबत काय निर्णय घेणार याकडे पंढरपूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख