पंढरपुरात भाजपला जोरदार धक्के  ः मोहिते पाटील, परिचारक समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश 

खरात यांच्या पाठीमागे तालुक्यातील धनगर समाजाचा एक वर्ग आहे, त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होणार आहे.
Mohite Patil, Paricharak supporters join NCP in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar
Mohite Patil, Paricharak supporters join NCP in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar

मंगळवेढा (जि. सोलापूर)  ः पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार रंगत आलेला असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. आमदार प्रशांत परिचारक समर्थकांची अजित पवारांनी गुरुवारी (ता. ८ एप्रिल) उशिरा भेट घेत त्यांना राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या पाठीशी उभे राहण्याचा शब्द घेतला. त्यानंतर आज (ता. ९ एप्रिल) पवारांनी पुन्हा मोहिते पाटील व परिचारक समर्थकांना राष्ट्रवादी कॉंग्रेसत प्रवेश दिला. अजितदादांच्या या दौऱ्यात मोहिते पाटील व परिचारक समर्थक भाजपला सोडचिठ्ठी देत पवारांच्या तंबूत प्रवेश करत असल्याने भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या समोरील अडचणी वाढणार आहेत. 

उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारपासून (ता. ८ एप्रिल) पंढरपूर दौऱ्यावर आहेत. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश दिल्यानंतर रात्री पंढरपूर शहरातील प्रमुख नेत्यांच्या घरी चहापानाच्या निमित्ताने भेटी दिल्या, त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

भाजपच्या वरिष्ठ नेत्याने आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाला व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांची बेरीज करत आपण ही जागा सहज ताब्यात घेऊ, असा आत्मविश्वास असताना परिचारक समर्थक नेते अजित पवारांच्या दौऱ्यात सहभागी होऊ लागले आहेत. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत धनगर समाजाचे नेते तानाजी खरात हे आमदार परिचारक यांच्या सोबत होते. पण, आज सकाळी मुढवी येथील तानाजी खरात यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. खरात यांच्या पाठीमागे तालुक्यातील धनगर समाजाचा एक वर्ग आहे, त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होणार आहे. 

दरम्यान, हुलजंती येथे झालेल्या कार्यक्रमात मोहिते पाटील यांचे समर्थक संतोष नेहतराव व पंढरपूरचे नगरसेवक सुरेश नेहतराव या दोघा भावांसह तळसंगी येथील उद्योगपती हनुमंत दुधाळ यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आवताडे यांचे साखर कारखानदारीतील भागीदार आणि नंदूर येथील फॅबटेक कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब रुपनर हेदेखील अजित पवारांच्या व्यासपीठावर उपस्थित होते. 

मंगळवेढा शहरातदेखील शुक्रवारी सायंकाळी दोन नगरसेवकांचा राष्ट्रवादी प्रवेश होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे भगिरथ भालके यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय, मागच्या निवडणुकीत आमदार परिचारक यांच्यासोबत असलेले रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा व नगरसेवक प्रशांत यादव, नगरसेवक अनिल बोदाडे यांच्याशी पवार हे भेटणार आहेत. भाजप व राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या दौऱ्यामुळे भाजपला नेते सांभाळण्याचे मोठे आव्हान उभे राहू लागले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com