भालकेंसोबत बैठक टाळणारे परिचारक आवताडेंच्या पहिल्याच मिटिंगला हजर - MLA Prashant Paricharak attended the administrative meeting at Mangalvedha after five and a half years | Politics Marathi News - Sarkarnama

भालकेंसोबत बैठक टाळणारे परिचारक आवताडेंच्या पहिल्याच मिटिंगला हजर

हुकूम मुलाणी
गुरुवार, 6 मे 2021

त्या बैठकीला आमदार परिचारक कधीच उपस्थित नसायचे.

मंगळवेढा  ः भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार प्रशांत परिचारक (MLA Prashant Paricharak) यांनी तब्बल साडेपाच वर्षांनंतर स्थानिक नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे (MLA Samadhan Avtade) यांच्यासमवेत आज (ता. ६ मे) तहसील कार्यालयात बैठक घेतली. कोरोनाच्या वाढता संसर्गाला आळा घालण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसंदर्भात ही बैठक झाली. (MLA Prashant Paricharak attended the administrative meeting at Mangalvedha after five and a half years)

दरम्यान, यापूर्वीच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये (स्व.) आमदार भारत भालके यांच्या उपस्थितीत नियमित बैठका व्हायच्या. त्या बैठकीला आमदार परिचारक कधीच उपस्थित नसायचे.

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत परिचारकांच्या परिश्रमामुळे भाजपने ही जागा खेचून आणली आहे. त्यानंतर आज तहसील कार्यालयात स्थानिक आमदार समाधान आवताडे यांनी घेतलेल्या बैठकीला स्वतः हजर राहून त्यांनी उपाय योजना करण्याच्या संदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या. यामध्ये नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी मतदारसंघातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सांगितले. 
      
आमदार परिचारक तसेच नवनिर्वाचित आमदार आवताडे यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. मंगळवेढा तालुक्यात असलेली रुग्ण संख्या, बेडची व्यवस्था, ऑक्सिजन बेडबाबतची सद्यस्थित, लसीकरण आणि उपलब्ध लस याबाबचा बाबतीत आढावा, व्हेंटिलेटरची व्यवस्था याबाबत अगोदर माहिती घेण्यात आली. नगरपालिका प्रशासनाने शासकीय रूग्णालयायास पूर्णपणे सहकार्य करावे, याबाबतही सूचना करण्यात आल्या.

हेही वाचा : पाण्यासारखा पैसा ओतला...देवांना साकडे घातले...तरीही कोरोनाने तीन भाऊ हिरावून नेले

या वेळी पक्ष म्हणून आम्ही प्रशासनसोबत आहोत. लागेल ती मदत आम्ही करू असे आमदार परिचारक यांनी सांगितले. तसेच, नगरपालिका प्रशासनाने शहरात प्रभागनिहाय नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांना, तर तहसीलदारांनी गावनिहाय सरपंच, कार्यकर्ते यांना सोबत घेऊन कोरोना टेस्टिंगसाठी प्रयत्न करावेत. तालुक्यातील प्रत्येक सेंटरवर रचनात्मक लसीकरण करावे, लसीकरण सेंटरवर जास्त गर्दी न करता प्रत्येकाला वैयक्तिक मेसेज करून रोज बोलवून घ्यावे या पद्धतीने लसीकरण केल्यास सर्वाना व्यवस्थित लस मिळेल. तसेच प्रशासनावर ताणही पडणार नाही.

तालुक्यातील सर्व डॉक्टरांची मदत घेऊन विविध मठ, शाळांमध्ये स्थानिक कोविड सेंटर उभारण्यात यावे. भाजी मंडई, किराणा दुकान याठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना या वेळी पोलिसांना देण्यात आल्या.

बैठकीस उपविभागीय आधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्निल रावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, नगरपरिषद मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, औदुंबर वाडदेकर, शशिकांत चव्हाण, युनूस शेख, सोमनाथ आवताडे, सरोज काझी, तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, बबलू सुतार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख