राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे लवकरच प्रमोशन : अशोक चव्हाणांची भविष्यवाणी  - Minister of State Dr. Vishwajit Kadam's soon promotion: Ashok Chavan's prediction | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे लवकरच प्रमोशन : अशोक चव्हाणांची भविष्यवाणी 

लक्ष्मीकांत मुळे 
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रमोशनचा विषय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काढल्याने त्यास एक वेगळे महत्त्व आहे.

अर्धापूर (जि. नांदेड) : राज्याचे सहकार आणि कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून गुरुवारी (ता. 29 ऑक्‍टोबर) भाऊराव साखर कारखान्याच्या रौप्यमहोत्सवी गाळप हंगामास सुरुवात झाली. या प्रसंगी आयोजित सभेत बोलताना डॉ. विश्वजित कदम यांच्या कामाचा विशेष उल्लेख करत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांचे लवकरच प्रमोशन होईल, अशी भविष्यवाणी केली. 

कॉंग्रेसमध्ये एक वजनदार नेते म्हणून अशोक चव्हाण यांची ओळख आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपदही सांभाळले आहे. त्यांनी कदम यांच्या प्रमोशनाचा विषय काढल्याने या विधानाला एक वेगळे महत्व आहे. राज्यमंत्री म्हणून चांगले काम करत असलेले कदम यांचे प्रमोशन होऊन कॅबिनेट मंत्री झाल्यास पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंग्रेसचे बळ वाढण्यासाठी मदत होणार आहे. 

गेल्या पाच वर्षात केंद्रात आणि राज्यात कॉंग्रेसचे सरकार नव्हते. गेल्या वर्षी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले. यात कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्यांची व नेत्यांच्या वारसदारांची मंत्रिपदी वर्णी लागली. त्यात डॉ. विश्वजित कदम यांचा समावेश आहे. कॉंग्रेसमध्ये (स्व.) पतंगराव कदम हे वजनदार नेते होते. मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत त्यांचे नाव कायम चर्चेत असायचे. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक महत्वाची खाती सांभाळली होती. त्यांच्या कार्याचा वारसा डॉ. विश्वजित कदम पुढे नेत आहेत. 

भाऊराव कारखान्याच्या यंदाच्या गाळप हंगामाच्या उद्‌घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कदम यांची उपस्थिती होते. त्यांनी आपल्या मनोगतात शंकरराव चव्हाण यांच्या शेतकरी हिताच्या निर्णयाचा, जलसिंचनाच्या कामांचा विशेष असा उल्लेख केला. तसेच युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी अशोक चव्हाण यांचे विशेष असे सहकार्य लाभले, हे आर्वजून सांगून कृतज्ञता व्यक्त केली. तसेच अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना कॉंग्रेसचे सर्वात जास्त आमदार निवडून आले होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केल्याचा विशेष असा उल्लेख कदम यांनी केला. 

माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही डॉ. विश्वजीत कदम हे राज्यमंत्री मंडळातील सर्वात तरुण व सुपरफास्ट मंत्री आहेत. विविध विभागाचे राज्यमंत्रिपद चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत, असे कौतुक केले. तसेच डॉ. शंकरराव चव्हाण व पतंगराव कदम यांचे चांगले संबंध होते, असेही आर्वजून सांगितले. पश्‍चिम महाराष्ट्रात पतंगराव कदम यांनी शैक्षणिक, साहित्य आदी विविध क्षेत्रांत भरीव असे काम केले आहे. तोच वारसा डॉ. विश्वजीत कदम पुढे नेत आहेत. मूर्ती लहान असली तरी किर्ती व काम महान आहे, असे चव्हाण यांनी गौरवोद्‌गार त्यांच्याविषयी काढले. तसेच, डॉ. विश्वजीत कदम यांचे लवकरच प्रमोशन होईल, असे भाकितही केले. 

डॉ. विश्वजीत कदम युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना राज्यात फिरून युवकांना कॉंग्रेसच्या प्रवाहात आणले. तसेच संघटनात्मक काम वाढविले आहे. राज्य मंत्रिमंडळात एक तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पश्‍चिम महाराष्ट्रात शैक्षणिक, सहकार, उद्योग क्षेत्रात कदम परिवाराचे मोठे योगदान आहे. डॉ. विश्वजीत यांच्या प्रमोशनचा विषय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काढल्याने त्यास एक वेगळे महत्त्व आहे. कॉंग्रेसमध्ये तरुणांना आणण्यासाठी डॉ. कदम यांचा भविष्यात कॉंग्रेसला फायदा होऊ शकतो. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख