'नाणार'साठी शरद पवार - उद्धव ठाकरेंशी भेट घालून देतो - Meet Sharad Pawar, Uddhav Thackeray; After that, a positive decision is possible regarding the Nanar project: Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

'नाणार'साठी शरद पवार - उद्धव ठाकरेंशी भेट घालून देतो

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

प्रकल्पाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध नसल्याचे रिफायनरी समर्थकांना सांगितले. 

रत्नागिरी : "नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सविस्तर मांडणी केली, तर प्रकल्पासाठी सकारात्मक निर्णय होऊ शकेल. त्यासाठी दोघांचीही भेट घालून देण्याची जबाबदारी मी घेतो,' असे आश्‍वासन देतानाच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रकल्पाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध नसल्याचे रिफायनरी समर्थकांना सांगितले. 

कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांच्यासह अविनाश महाजन, विद्याधर राणे, जुनेद मुल्ला, सचिन आंबेरकर, नीलेश पाटणकर, केशव भट, आनंद जोशी, प्रमोद खेडेकर, सचिन शिंदे यांनी शनिवारी (ता. 7 नोव्हेंबर) रात्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री पाटील यांची भेट घेतली. 

या प्रसंगी क्रेडाईतर्फे दीपक साळवी व राजेश शेट्ये यांनीही रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निवेदन दिले. राजापूर तालुक्‍यातील प्रस्तावित रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर समर्थन वाढले आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न व्हावेत आणि या प्रकल्पाची अधिसूचना पुन्हा काढली जावी, अशी मागणी त्या निवेदनाद्वारे करण्यात आली. 

रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन वाढत असून साडेआठ हजार एकर जमीन मालकांनी जागा देण्यासाठी संमतीपत्रे दिली आहेत. ती मंत्री पाटील यांच्यापुढे सादर करण्यात आली. या प्रकल्पामुळे जिल्ह्याचे अर्थकारण बदलणार असून तो लवकरात लवकर मार्गी लावावा. सरकारमधील अधिकृत नेत्यांनी जाहीर केलेली भूमिका "जिथे जमीन द्यायला तयार होतील, तिथे आम्ही प्रकल्प करायला तयार आहोत' अशी आहे. 

"नाणार'साठी जमीन देणाऱ्यांच्या संमतीचाही विचार करावा. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घडवून द्यावी, अशी मागणीही या नाणार प्रकल्पाच्या समर्थकांनी केली. त्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वरील आश्‍वासन दिले. 

राष्ट्रवादी पक्षाबरोबरच शरद पवार यांनी कधीही प्रकल्पास विरोध केलेला नाही. प्रकल्पाचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत. त्यांची वेळ घेतल्यानंतर कुमार शेट्ये, अजित यशवंतराव यांच्यामार्फत निरोप देतो, असे जयंत पाटील या वेळी म्हणाले. 

रिफायनरी प्रकल्प व्हावा, या साठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आम्हाला भेट दिली आणि आमचे म्हणणे ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. 

- अविनाश महाजन, प्रकल्प समर्थक 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख