पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत जयंत पाटलांनी केले हे भाष्य - Jayant Patil do the this comment regarding the result of Pandharpur by-election | Politics Marathi News - Sarkarnama

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत जयंत पाटलांनी केले हे भाष्य

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 27 एप्रिल 2021

खरं म्हणजे निवडणूक आयोगानेच याचं भान ठेवायला पाहिजे होतं.

पुणे : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल, याबाबत आम्हाला कोणतीही शंका नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज पुण्यात बोलताना केला.

पुण्यातील कात्रज भागात साकारलेल्या ८० बेडच्या कोविड रुग्णालयाचे लोकार्पण जलसंपदा मंत्री पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत वरील भाष्य केले. 

पोटनिवडणुकीमुळे पंढरपूर-मंगळवेढ्यातदेखील मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. पश्चिम बंगालमध्ये तीच परिस्थिती आहे. जिथं जिथं निवडणका झाल्या आहेत, त्या त्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. खरं म्हणजे निवडणूक आयोगानेच याचं भान ठेवायला पाहिजे होतं. त्यामुळे मद्रास हायकोर्टाने अत्यंत योग्य भूमिका घेतली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली असती तर ममता बॅनर्जी यांचं सरकार आणखी चार महिने वाढलं असतं. बाकी काहीही झालं नसतं. आता विधानसभा निवडणुकीनंतरही ममता बॅनर्जी यांचाच पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर येणार आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या संक्रमण काळात अशी गर्दी करणं योग्य नव्हतं. गर्दी होणार याची दक्षता घेऊन निवडणूक आयोगाने ही निवडणूक पुढे ढकलायला हवी होती. पण ती पुढे न ढकलल्याने मद्रास हायकोर्टाने ओढलेले ताशेरे आणि त्यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे, असे मत जलसपंदा मंत्री पाटील यांनी व्यक्त केले. 

अजित पवारांच्या भूमिकेचे समर्थन 

पंढरपूर-मंगळवेढ्यातील वाढत्या कोरोनाला नागरिक जबाबदार आहेत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्याचे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी समर्थन केले. ते म्हणाले की नागरिक एकत्र आल्यानंतरच कोरोनाचा संसर्ग वाढतो. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आम्ही वेळेचे बंधन पाळून प्रचार केलेला आहे,असे पाटील म्हणाले.

निवडणूक आयोगावर टीका

निवडणूक घेण्याचा अट्टाहास निवडणूक आयोगाने केला नसता तर ह्या प्रचारसभा झाल्या नसत्या. निवडणुका पुढे ढकलून आपण हे सर्व टाळू शकलो असतो. आता होत असलेला कुंभमेळाही टाळता आला असता. पण आपण या गोष्टींमध्येच जास्त गर्क होतो. त्यामुळे कोविडची परिस्थिती जगाने कशी हाताळली आणि आपण कशी हाताळली, याची तुलना केली जात आहे. कुठल्या देशानी कसे निर्णय घेतले आणि कुठले देश त्यात मागे राहिले, हेही पाहिले जात आहे, असे पाटील म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख