राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्या मुलावर गुन्हा नोंदविण्याचा कोर्टाचा आदेश - Court orders registration of case against NCP MLA Babanrao Shinde's son for taking mutual loan | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्या मुलावर गुन्हा नोंदविण्याचा कोर्टाचा आदेश

प्रशांत काळे
शनिवार, 23 जानेवारी 2021

पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही; म्हणून न्यायालयात फिर्याद दाखल करावी लागल्याचे शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

बार्शी (जि. सोलापूर) : शेतकऱ्याच्या नावावर कागदपत्रे तयार करून बँकेकडून परस्पर  ३ लाख रुपये कर्ज उचलल्याप्रकरणी माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे (अध्यक्ष, बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीज तुर्कपिंपरी, ता. बार्शी) यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश  बार्शीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एस. धडके यांनी बार्शी पोलिसांना दिला.

या प्रकरणी तुर्कपिंपरी (ता. बार्शी) येथील बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रणजितसिंह बबनराव शिंदे, कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक, शाखाधिकारी (बँक ऑफ इंडिया, शाखा ढगे मळा, बार्शी) व अन्य एक अशा चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्याचा आदेश बार्शी न्यायालयाने दिला. शेतकरी श्रीहरी श्रीपती शिंदे (रा. बाभूळगाव) यांनी या प्रकरणी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.

फिर्यादीनुसार याबाबतची माहिती अशी, बार्शी शहरातील ढगे मळा येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत श्रीहरी शिंदे यांच्या नावाने कागदपत्रे तयार करुन बँक खाते उघडण्यात आले. त्या खात्यावर ३ लाख रुपये कर्ज मंजूर करून शाखाधिकाऱ्यांनी २८ सप्टेंबर २०१६ रोजी रणजितसिंह बबनराव शिंदे यांच्या बँक खात्यावर रक्कम परस्पर वर्ग केली. 

या कर्जप्रकरणाबाबत श्रीहरी शिंदे यांना कोणतीही कल्पना नव्हती. बँकेने मुंबईचे अॅड. योगीराज पुरवंत यांच्यामार्फत रक्कम व त्यावरील व्याज अशी ३ लाख ९३ हजार २०३ रक्कम भरण्याची नोटीस शिंदे यांना पाठवली. तेव्हा ही घटना उघडकीस आली. या कर्जप्रकरणाबाबत शिंदे यांनी रणजितसिंह शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता १८ फेब्रुवारी २०२० रोजी पत्र देऊन थकीत रक्कम आठ दिवसांत भरण्याचे कबूल केले होते. मात्र, अद्यापपर्यंत कर्जाची रक्कम भरलेली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.

श्रीहरी शिंदे यांच्या दोन मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी पैशाची आवश्यकता असताना, केवळ या थकीत कर्जामुळे आगळगाव येथील बँकेकडून कर्ज मिळाले नाही. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, बार्शी शहर पोलिस यांच्याकडे फसवणुकीची तक्रारही दाखल केली. पण, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही; म्हणून न्यायालयात फिर्याद दाखल करावी लागल्याचे शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. श्रीहरी शिंदे यांच्या वतीने अॅड. आर. यू. वैद्य, अॅड के. पी. राऊत यांनी काम पाहिले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख