हॅट्‌ट्रीकचे स्वप्न पाहणारे चंद्रकांतदादा क्‍लीन बोल्ड होणार : सतेज पाटलांचा टोला  - Chandrakant Patil will be clean bold in Pune graduate: Satej Patil | Politics Marathi News - Sarkarnama

हॅट्‌ट्रीकचे स्वप्न पाहणारे चंद्रकांतदादा क्‍लीन बोल्ड होणार : सतेज पाटलांचा टोला 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असून अत्यंत मायक्रो लेव्हलचे प्लॅनिंग केले आहे. 

कोल्हापूर : "महाविकास आघाडीने केलेल्या मायक्रो प्लॅनिंगमुळे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील पाचही जागांवर महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होतील. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे पुणे पदवीधर मतदारसंघातून हॅट्‌ट्रीक करण्याचे भंगणार असून ते क्‍लीन बोल्ड होणार आहेत,' असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी लगावला. 

सतेज पाटील यांनी मतदान केंद्रांवर भेट देत पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पाटील म्हणाले की, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील विधान परिषदेची निवडणूक पहिल्यांदाच चुरशीची झाली आहे. कारण यामध्ये सुरुवातीपासूनच पक्षीय पातळीवर सर्व गोष्टी घडत आहेत. मतदारांची नोंदणी, प्रचार, मेळावे, मतदानासाठी मतदारांना घराबाहेर काढणे या सर्वच ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केले आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असून अत्यंत मायक्रो लेव्हलचे प्लॅनिंग केले आहे. 

पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहले आहेत. यामुळे महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्‍चित आहे. या मतदारसंघातून चंद्रकांत पाटील हे हॅट्‌ट्रीक करण्याचे स्वप्न बघत आहेत. पण, हॅट्‌ट्रीक तर सोडाच तेच क्‍लीन बोल्ड होणार आहेत, अशी टीका सतेज पाटलांनी केली. 

भाजपचे उमेदवार संग्राम देशमूख व कृषी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम सांगली जिल्ह्यातील एका बुथवर समोरासमोर आले. दोघांनीही एकमेकांना नमस्कार केला. याबाबत सतेज पाटील यांना विचारले असता ते म्हणाले,"ओळखीच्या दोन व्यक्ती समोरासमोर आल्यावर नमस्कार म्हणण्याचा शिष्टाचार आहे. त्या प्रमाणे त्यांनी नमस्कार केला असेल. त्याचा वेगळा अर्थ काढू नका.' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख