सांगली : "पुणे पदवीधर मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अरुण लाड 72 वर्षाचे आहेत. या ज्येष्ठ उमेदवाराला पाच जिल्ह्यांत फिरणे होणार आहे का? आम्हाला काहीच दिले नाही, असे सारखे तक्रार करणाऱ्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. हे घ्या, एकदाचे तुम्हाला दिले, असे सांगण्यापुरते ते उमेदवार आहेत. भाजपचे संग्रामसिंह देशमुख तरुण, धावणारे, कर्तृत्ववान आहेत,' अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.
पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. माजी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत व्यासपीठावर होते. अचानक नाराज झालेल्या सदाभाऊ यांची समजूत काढली आहे, ते ताकदीने आपल्याबरोबर आहेत, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
पाटील म्हणाले, "राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी देताना विजयाची खात्री नसल्याने लाड यांची निवड केली आहे. कारण, अनेकजण अपेक्षा ठेवून असतात. अशा जागी उमेदवारी दिली की सांगायला बरे पडते, तुम्हाला आम्ही संधी दिली. पण, तुम्ही पडलात, आता आम्ही काय करू? असा प्रकार आहे.
आमचा उमेदवार तरुण आहे, 47 वर्षांचा आहे. कामाचा माणूस आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले, देशाचे आणि राज्याचे मानाचे पुरस्कार जिंकले आहेत. अतिशय चांगले काम करून दाखवले आहे. असा कामाचा माणूस आमदार झाला तर आपल्याला, विकासाला गती देता येईल.''
जयंत पाटील यांच्यावर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "गेल्या विधानसभा निवडणुकीत मी कोथरूडमध्येच अडकून पडलो, त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघाकडे फार लक्ष देता आला नाही. थोडा वेळ मिळाला असता तर जयंत पाटील यांची त्याचवेळी सुटी करून टाकली असती.
स्वतःला राज्याचे नेते समजतात, पण ते राज्याचे कुठले जिल्ह्याचे, तालुक्याचे नेते आहेत. गेल्या विधानसभेला आमच्यात तीन तुकडे पडले. जरा बिनसलं. त्यामुळे अडचण झाली. मला थोडा वेळ मिळाला असता तर येथील विषय संपवले असते. मी कोथरुडमध्ये अडकलो, त्यामुळे इस्लामपूरमध्ये फार लक्ष देता आले नाही. आता येत्या विधानसभेला त्यांना मी सुटी देत नसतो.''

