भाजप नेते कल्याणराव काळे शरद पवारांच्या ताफ्यात

श्री. पवार आमदार भारत भालकेंच्या सांगोला रोडवरील निवासस्थांनी विश्रांतीसाठी थांबले होते. तेथे त्यांनी जेवण घेतले. त्यानंतर श्री.पवार यांनी काही मोजक्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याच दरम्यान श्री.काळे हे देखील आमदार भालकेंच्या निवासस्थांनी श्री. पवारांची भेट घेण्यासाठी पोचले. निवासस्थानातून सूचना आल्याशिवाय कोणालाही आता मध्ये प्रवेश दिला जात नव्हता. आपल्याला आतामध्ये बोलावून घेतील या आशेने श्री. काळे बराच वेळ गेटवर इतर कार्यकर्त्यांसारखे थांबले होते.
भाजप नेते कल्याणराव काळे शरद पवारांच्या ताफ्यात
BJP Leader Kalyan Kale Met Sharad Pawar in Pandharpur

पंढरपूर : राष्ट्रवादीचे नेते व  माजी केंद्रीय मंत्री शरद पवार मंगळवारी (ता. २९) पंढरपूर दौऱ्यावर आले होते. शरद पवारांचा दौरा पूर्णतः खासगी असला तरी पडद्या आड काही राजकीय घडामोडी घडल्याची चर्चा सुरु आहे. शरद पवारांच्या या दौऱ्यात भाजप नेते कल्याणराव काळे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान आमदार भारत भालकेंच्या निवासस्थानी श्री.पवारांच्या भेटीसाठी  थांबलेल्या  श्री. काळेंना प्रवेश नाकारल्याने काळे समर्थक अधिकच अस्वस्थ झाले आहेत.

माजी आमदार सुधाकर परिचारक, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि प्रसिध्द किर्तनकार रामदास महाराज जाधव यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर श्री. पवार  मंगळवारी   त्यांच्या कुटुंबियाच्या सांत्वनपर भेटीसाठी आले होते. 

मंगळवारी (ता. २९) दुपारी  भोसे येथे (कै) राजूबापू पाटील यांचे चिरंजीव अॅड. गणेश पाटील व त्यांच्या कुटुंबियाची श्री. पवारांनी भेट घेतली. यावेळी कल्याणराव काळेंसह आमदार भारत भालकेंची अवर्जून उपस्थिती होती. त्यानंतर शरद पवार थेट संत कैकाडी महाराज मठामध्ये दाखल झाले. तेथे रामदास महाराजांच्या कुटुंबियाची भेट घेतली. तेथेही कल्याणराव काळे अवर्जून उपस्थित होते. तेथून पवारांचा ताफा  परिचारकांच्या वाड्यात गेला. तेथे श्री. पवार यांनी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक व त्यांच्या कुटुंबियांची भेट  घेतली. यावेळी श्री. काऴेंसह  अनेक  नेते उपस्थित होते.

गाठीभेटी झाल्यानंतर श्री. पवार आमदार भारत भालकेंच्या सांगोला रोडवरील निवासस्थांनी विश्रांतीसाठी थांबले होते. तेथे त्यांनी जेवण घेतले. त्यानंतर श्री.पवार यांनी काही मोजक्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याच दरम्यान श्री.काळे हे देखील आमदार भालकेंच्या निवासस्थांनी श्री. पवारांची भेट घेण्यासाठी पोचले. निवासस्थानातून सूचना आल्याशिवाय कोणालाही आता मध्ये प्रवेश दिला  जात नव्हता. आपल्याला आतामध्ये बोलावून घेतील या आशेने श्री. काळे बराच वेळ गेटवर इतर कार्यकर्त्यांसारखे थांबले होते. 

श्री.काळे हे बाहेर गेटवर थांबले आहेत,  त्यांना आतामध्ये घ्या असा निरोप  उपस्थित कार्यकर्त्याकरवी  आतामध्ये पोचवला तरीही  त्यांना आतामध्ये सोडण्यात आले नाही. शेवटी  वाट पाहून  श्री.काळे यांनी तेथून काढता पाय घेतला. श्री. काळे हे नाराज होवून निघून गेल्याचे कळताच राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने त्यांना फोन केला. दरम्यान ते घरी पोचले होते. शेवटी मग त्यांनी जाताजाता हेलिपॅडवर जावून पवारांची भेट घेतली. भेटी दरम्यान त्यांच्यात कोणत्या विषयावर  चर्चा झाली हे  मात्र समजू शकले नाही. दिवसभर श्री. पवारांच्या ताफ्यासोबत फिरुनही कल्याणराव काळे यांना आमदार भालकेंच्या घरी थांबलेल्या पवारांना भेटता आले  नसल्याचीच सध्या  जोरदार  चर्चा सुरु आहे.

कल्याणराव काळे यांच्या विषयी पवारांकडे तक्रार
भाजप नेते तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांना मदत करुनही त्यांनी सलग तीन विधानसभा निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी उमेदवाराच्या  विरोधात काम केले आहे. पक्षाच्या पदाधिकार्यांना नाहक त्रास दिला आहे. त्यामुळे श्री. काळे यांच्या कारखान्यांना  मदत करताना त्यांना सक्त सुचना करावी अशी लेखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दीपक पवार यांनी मंगळवारी (ता.२९) शरद पवार यांच्याकडे केली आहे.

श्री. काळे यांनी आपल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याकडे असलेल्या  राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांच्या सभासदांचे सभासत्व रद्द केले आहे. आणखी काही सभासदांचे सभासदत्व रदद्  करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. कारखान्याला मदत करताना रद्द केलेल्या सभासदांचे सभासदत्व परत द्यावे अशी त्यांना सूचना करुनच मदत करावी. असे ही त्यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षानेच श्री. काळे यांच्या विषयी थेट पवारांकडे तक्रार  केल्याने श्री. पवार ही तक्रार किती गांभीर्याने घेतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in