कुल गटाला हादरा : 'भीमा-पाटस'च्या उपाध्यक्षांचा नवख्या तरुणाने केला पराभव  - Bhima-Patas Sugar Factory Vice President was defeated by youth in the Gram Panchayat elections | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

कुल गटाला हादरा : 'भीमा-पाटस'च्या उपाध्यक्षांचा नवख्या तरुणाने केला पराभव 

रमेश वत्रे 
मंगळवार, 19 जानेवारी 2021

निवडणुकीत कोण बाजी मारते, याकडे लक्ष लागले होते. 

केडगाव (जि. पुणे) : दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार रमेश थोरात गटाच्या, पंचायत समितीच्या माजी उपसभापती आशा डेंबळकर यांच्या गटाने बाजी मारली. या निवडणुकीत आमदार राहुल कुल गटाचे पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा भीमा पाटस साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर यांचा पराभव झाला. चार वॉर्डातून 11 जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात होते. 

आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांच्या समर्थकांत ही सरळ लढत झाली. ग्रामपंचायत निवडणुकीत बारवकर व डेंबळकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल समोरासमोर उभे ठाकले होते. निवडणुकीत कोण बाजी मारते, याकडे लक्ष लागले होते. 

नामदेव बारवकर यांचा विशाल बारवकर या नवख्या तरुणाने पराभव केला. सदगुरू जनसेवा पॅनेलचे नेतृत्व नामदेव बारवकर, मारुती कोकरे, डी. डी. बारवकर, अकबर शेख, गोरख जगताप यांनी केले. या पॅनेलला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. 

गुरू नारायण महाराज ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व आशा डेंबळकर यांचे पती रामदास डेंबळकर, आदेश जाचक, नीलेश बारवकर, जालिंदर बारवकर यांनी केले. या पॅनेलने आठ जागा जिंकत ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली. 

गुरू नारायण महाराज ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार : गणेश जाधव, कल्पना शितोळे, राजवर्धन जगताप, अक्षय बारवकर, वैशाली बारवकर, प्रमिला वाघापुरे, विशाल बारवकर, विजया बारवकर. 

सदगुरू जनसेवा पॅनेलचे विजयी उमेदवार : श्रद्धा गवळी, लता रासकर, संतोष मोरे. 

पितापुत्राचा पराभव, मुलगी जिंकली 

नामदेव बारवकर हे जुन्या पिढीतील राजकारणी. त्यांनी 1985 मध्ये पुणे जिल्हा बॅंकेची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये बारामतीचे भगवान काकडे व बारवकर यांना समान मते पडल्याने चिठ्ठी टाकण्यात आली. काकडे यांची चिठ्ठी निघाल्याने बारवकर यांचा पराभव झाला. त्यांच्या बरोबरचे माजी आमदार रमेश थोरात सोडले, तर आता कुणीही सक्रीय राजकारणात नाही. नामदेव बारवकर यांचा मुलगा दीपक बारवकर यांचाही वरवंड ग्रामपंचायतमध्ये पराभव झाला तर त्यांची मुलगी जयश्री कुदळे यांची पडवी ग्रामपंचायतमध्ये बिनविरोध निवड झाली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख