भालके-परिचारक स्नेह वाढला; ते स्मृतिपत्र देण्यासाठी प्रशांत परिचारक पोचले भालकेंच्या घरी! 

परिचारक-भालके कुटुंबीयांचा स्नेह पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍यात चर्चेचा विषय झाला आहे.
Bhalke-Paricharak  affection increased; Prashant Paricharak reached Bhalke's house to hand over the memento
Bhalke-Paricharak affection increased; Prashant Paricharak reached Bhalke's house to hand over the memento

पंढरपूर : आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. येत्या काही दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रमदेखील जाहीर होईल, असा अंदाज असतानाच गेल्या 20 वर्षांपासून राजकीय विरोधक असलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक आणि भालके कुटुंबीयांतील राजकीय व कौटुंबीक स्नेह वाढू लागला आहे. 

आमदार भालके यांच्या निधनानंतर परिचारक-भालके यांच्यातील राजकीय दरी खूप कमी झाल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. विधानसभेने (कै.) आमदार भारत भालके यांच्या स्मरणार्थ दिलेले स्मृतिपत्र आज (ता. 27 फेब्रुवारी) आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते भगिरथ भालके व त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्त करण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर वाढलेला परिचारक-भालके कुटुंबीयांचा स्नेह पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍यात चर्चेचा विषय झाला आहे. 

आमदार भारत भालके यांनी 2004 मध्ये माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या विरोधात पहिली विधानसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हापासून पंढरपूर तालुक्‍यात परिचारक विरुध्द भालके असे दोन राजकीय गट निर्माण झाले आहेत. पुन्हा 2009 मध्ये भालके यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत मोहिते पाटील यांचा पराभव करत भालके हे राज्याच्या राजकारणात जायंट किलर ठरले होते. 

त्यानंतर 2014 मध्ये पुन्हा आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात आमदार भालके यांनी दंड थोपटून आव्हान दिले होते. त्या निवडणुकीतही प्रशांत परिचारक यांचा सात ते आठ हजार मतांनी पराभव करत भालकेंनी प्रथमच परिचारकांच्या राजकीय वर्चस्वाला थेट आव्हान दिले होते. 

गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदार भालके यांनी 25 वर्षे आमदार राहिलेले ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांचा धक्कादायक पराभव करत विजयाची हॅट्‌ट्रीक केली होती. त्यानंतर मात्र एक वर्षाच्या आतच त्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आता पोटनिवडणुकीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. 

राष्ट्रवादीकडून पुन्हा आमदार भालकेंच्या कुटुंबातील एकाला उमेदवारी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. दुसरीकडे, त्यांचे पारंपारिक विरोधक असलेले परिचारक निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच आमदार प्रशांत परिचारक आणि भगिरथ भालके यांच्यात राजकीय स्नेह वाढू लागला आहे. 

भारत भालके यांच्या निधनानंतर प्रशांत परिचारकांचे किमान तीन ते चार वेळा भालकेंच्या घरी येणे जाणे झाले आहे. त्यानंतर विधानसभेने आमदार भालकेंना स्मृतीपत्र दिले आहे. ते स्मृतीपत्र आज (ता. 27 फेब्रुवारी) आमदार परिचारक यांच्या हस्ते भालके कुटुंबीयांकडे त्यांच्या घरी जाऊन सुपूर्त केले. 

या वेळी भालके कुटुंबीय व पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव हे उपस्थित होते. परिचारक आणि भालके यांच्यातील वाढत्या स्नेहाविषयी मतदार संघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आमदार परिचारक विधानसभेसाठी भालकेंना पाठिंबा देणार की, भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार? याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com