संजय शिंदे गटाचा दावा फोल ठरवत नारायण पाटील गटाचे सभापतिपदावर शिक्कामोर्तब 

आमदार संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पंचायत समिती सभापती निवडीत चमत्कार घडवणार, असा दावा केल्याने या निवडीकडे करमाळा तालुक्याचे लक्ष लागले होते.
Atul Patil of Narayan Patil group unopposed as the chairman of Karmala Panchayat Samiti
Atul Patil of Narayan Patil group unopposed as the chairman of Karmala Panchayat Samiti

करमाळा (जि. पुणे) : करमाळा पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील समर्थक, डब्बल उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबाबत आमदार संजय शिंदे समर्थक पंचायत समिती सदस्य अॅड. राहुल सावंत यांचा ९ तारखेला चमत्कार करण्याचा दावा अक्षरश फोल ठरला. विशेष म्हणजे या निवडीच्या वेळी अॅड. राहुल सावंत गैरहजर होते. (Atul Patil of Narayan Patil group unopposed as the chairman of Karmala Panchayat Samiti)

करमाळा पंचायत समितीच्या सभापतीची ता.1 जुलै रोजी निवड होती. मात्र, आमदार संजय शिंदे समर्थक पंचायत समिती सदस्य अॅड. राहुल सावंत यांनी सभापती निवडीची नोटीस सात दिवस आधी मिळाली नसल्याची तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन तहसीलदार समीर माने ही निवड पुढे ढकलली होती. ही निवड पुढे ढकलल्याने आणि अॅड. सावंत यांनी आमदार संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पंचायत समिती सभापती निवडीत चमत्कार घडवणार, असा दावा केल्याने या निवडीकडे करमाळा तालुक्याचे लक्ष लागले होते.

पंचायत समितीवर शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांची सत्ता आहे. सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त सभापतीपदी अतुल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया आज सुरू झाल्यानंतर सभापतीपदासाठी अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांचा अर्ज वैध ठरला, त्यामुळे अतुल पाटील यांच्या बिनविरोध निवडीची  घोषणा पिठासीन अधिकारी समीर माने यांनी केली. 

पंचायत समितीची सत्ता शिवसेनेकडे असून माजी आमदार नारायण पाटील यांच्याकडे 10 सदस्यांपैकी 6 सदस्य होते. याशिवाय, शिंदे गटाच्या जया जाधव, बागल गटाच्या स्वाती जाधव, जगताप गटाच्या मंदाकिनी लकडे यांनीही आज पाटील गटाला उघड पाठिंबा दिला. त्यामुळे ही निवड एकतर्फी झाली.

बिनविरोध निवडीनंतर अतुल पाटील यांचे माजी आमदार नारायण पाटील, सभापती गहिनीनाथ ननवरे, शेखर गाडे, उपसभापती दत्ता सरडे, पंचायत समिती सदस्या केशर चौधरी, स्वाती जाधव, मंदाकिनी लकडे, स्वाती मुळे, दत्ता जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, पृथ्वीराज पाटील, बिभीषण आवटे, देवानंद बागल, नागा लकडे, अशोक जाधव, बंडु टापरे, राजू भोसले यांच्यासह उपस्थितांनी स्वागत केले.

निवड प्रक्रिया पुढे ढकलल्याने काही अनुचित प्रकार घडू नये; म्हणून पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

काय आनंद मिळाला, त्यांनाच माहिती : अतुल पाटील

सभापती म्हणून माझी एक जुलै रोजी निवड निश्चित झाली होती. मात्र कायद्याच्या नावाखाली आमदार संजय शिंदे यांनी अॅड. सावंत यांना हाताशी धरून ही प्रक्रिया पुढे ढकलली. ही प्रक्रिया पुढे ढकलून त्यांना नेमका काय आनंद मिळाला, हे त्यांनाच माहिती. अशा पद्धतीने तालुक्यात राजकारणाचा वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न होत असेल तर सर्व गटातटाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. भविष्यात आमचे नेते, माजी आमदार नारायण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे, असे नवनिर्वाचित सभापती अतुल पाटील यांनी सत्कारानंतर सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com