...अन्‌ परिचारकांच्या प्रश्‍नाची बैठक जयंत पाटलांऐवजी अजितदादांकडे घेण्याचे ठरले!  - ... and MLA Prashant Paricharak's question meeting was decided to be held with Ajit Pawar instead of Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

...अन्‌ परिचारकांच्या प्रश्‍नाची बैठक जयंत पाटलांऐवजी अजितदादांकडे घेण्याचे ठरले! 

प्रमोद बोडके 
रविवार, 24 जानेवारी 2021

शिंदे यांनी परिचारक यांचा प्रश्‍न तातडीने मार्गी लागेल, याची काळजी घेत पुन्हा एकदा मैत्री निभावली. 

सोलापूर : सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक एकमेकांना काढलेले चिमटे आणि कोपरखळ्यांनी गाजली. समितीच्या अखर्चिक निधीबाबतही चर्चा झाली. आत्तापर्यंत 11 टक्केच निधी खर्च झाला असून उर्वरीत 90 टक्के निधीच्या खर्चाबाबत मान्यवरांनी वेगवेगळे उपाय सुचविले. 

भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी जिल्ह्यातील बंधारे दुरुस्तीचा विषय काढला. त्याबाबत पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी जयंत पाटलांकडे बैठक लावण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, पाटील हे 15 दिवस दौऱ्यावर असल्याची माहिती आमदार संजय शिंदे यांनी देताच ही बैठक जयंत पाटलांऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे घेण्याचे ठरले. शिंदे यांनी परिचारक यांचा प्रश्‍न तातडीने मार्गी लागेल, याची काळजी घेत पुन्हा एकदा मैत्री निभावली. 

पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. कोरोनामुळे कपात झालेला निधी, उशिरा प्राप्त झालेला निधी यावर चर्चा झाली. जिल्हा नियोजन समितीकडून 2020-21 या आर्थिक वर्षात मिळालेल्या निधीपैकी 11 टक्केच निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. येत्या 60 दिवसांत (मार्च अखेरपर्यंत) 90 टक्के निधी कसा खर्च करणार? असा प्रश्‍न या वेळी माजी मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला होता. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी हा निधी झेडपीला वर्ग करण्याचा सल्ला दिला. हा निधी झेडपीकडे वर्ग झाल्यास वर्षभर वापरता येईल, अशी सूचना केली. 

प्रत्येक जिल्ह्यासाठी गेल्या वर्षी देण्यात आलेल्या निधीतून दहा टक्के निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला, तर पाच टक्के निधी अतिवृष्टीसाठी वर्ग करण्याची हालचाल सुरु झाल्याचे खरे आहे का? असा प्रश्‍न आमदार बबनदादा शिंदे यांनी भरणे यांना केला. भरणे यांनी निधी वर्गच्या हालचालींना दुजोरा देताच हा निधी तातडीने झेडपीला देण्याची मागणी शिंदे यांनी केली. 

पंढरपूर आणि सांगोला तालुक्‍यासाठी असलेल्या पाणी पुरवठा योजना भीमा नदीवरील ज्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यावर आहेत. तो बंधाराच नादुरुस्त आहे. पाणी साठवणार कसे? असा प्रश्‍न आमदार प्रशांत परिचारक यांनी उपस्थित केला. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील सीना, माण आणि भीमा नदीवरील बहुतांश बंधाऱ्यांची पडझड झाली असल्याचे त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींनी सांगितले. 

पावसाळ्यापूर्वी ही कामे मार्गी लागावीत, यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे तातडीने बैठक लावण्याचे आश्‍वासन पालकमंत्री भरणे यांनी दिले. पण, पुढील 15 दिवस पाटील हे दौऱ्यावर असल्याची माहिती आमदार संजय शिंदे यांनी सभागृहात दिली. त्यामुळे ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लावावी का? यावर चर्चा झाली. पवार यांची वेळ घेऊन ही बैठक तातडीने लावण्याचे निश्‍चित झाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख