अमरावती : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र, सेलिब्रिटी आणि काही लोकप्रतिनिधीही हे आवाहन धुडकावून लावत असल्याचे दिसत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची शिवजयंतीच्या दिवशी घेतलेली बुलेट सवारी त्यांना चांगलीच महागात पडली आहे. राणा दांपत्य विनामास्क बुलेटवरुन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त खासदार नवनित राणा व आमदार रवी राणा फरशी स्टॉफ येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी तोंडाला मास्क न लावता बुलेटवरुन आले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सींग ठेवले नव्हते. त्यामुळे फ्रेजरपुरा पोलिसांनी राणा दाम्पत्यासह कार्याकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी शनिवारी ही कारवाई करीत खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या सह २० कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला.
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा विविध कारणांमुळे चर्चेत येत असतात. दोनच दिवसांपूर्वी अभिनेता विवेक ओबेराॅयची बाईक स्वारी चर्चेत आली होती. त्यालाही मुंबई पोलिसांनी दंड ठोठावला. त्यामुळे राणा दांपत्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न विचारला जात होता. राणा दांपत्याने शिवजयंतीच्या दिवशी बुलेटवरुन जाताना तोंडाला मास्क लावला नव्हता, तसेच हेल्मेटही घातले नव्हते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला.
Edited By - Amit Golwalkar

