बार्शी : राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण होताच पक्षवाढीसाठी आपल्याच पक्षात कार्यकर्त्यांना घेण्यासाठी या सत्तेतील तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पण, बार्शी तालुक्यात एका गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपीस माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत औरंगाबादमधील गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदेही आरोपीच्या गराड्यात सापडले, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात वर्तुळात सुरु झाली आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. 31 जानेवारी) सोलापूर येथे पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. हा सोहळा सोशल मीडियावर लाइव्ह होता अन् त्यानंतर फोटोसेशनही झाले.
खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी बबलू शेट्टी याला कॉंग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. त्याला बार्शी कॉंग्रेसचे पदाधिकारीही करण्यात आले आहे. तसेच, बार्शी तालुक्यातील शिक्षण संस्थाचालक बाळासाहेब कोरके यांच्यावर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी कॉंग्रेसकडून देण्यात आली आहे. पण, संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या पगारी परस्पर घेतल्याचा आरोप कोरके यांच्यावर आहे. या जबाबदारीमुळे तालुक्यातील राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कोरकेंनी केवळ राजकीय हात पाठिशी असावा, या हेतूनेच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा बार्शी तालुक्यात रंगली आहे.
केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी चोखपणे पार पाडलेल्या आणि कॉंग्रेसचा स्वच्छ चेहरा असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांच्याच हस्ते आरोपींना कॉंग्रेस पक्षात प्रवेश दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचा हात डागळल्याची चर्चा होत आहे.
बबलू शेट्टी हा खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी असून सध्या जामीनावर बाहेर आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची सुनावणी बार्शी येथील सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम टप्प्यात सुरू आहे. नागेश गाढवे या युवकाचा 30 मे 2014 रोजी खून झाला होता. त्यामध्ये शेट्टी यास अटक झाली होती.
बाळासाहेब कोरके यांनी शिक्षकांचे वेतन सुमारे 30 लाख परस्पर हडपल्याप्रकरणी माढा पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी कोरके यांचा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयाने तात्पुरत्या स्वरुपात त्यांना दिलासा दिला आहे. तसेच, राज्य सरकारकडून कोरके यांच्या प्रस्तावित शिक्षण संस्थाची चौकशीही सुरु आहे.
कॉंग्रेस शहराध्यक्ष जीवन आरगडे यांच्याविरुद्धही फसवणूक, धनादेश अनादर या सारख्या गंभीर गुन्ह्यांत आरोपपत्र दाखल आहे. त्यामुळे बार्शी तालुक्यातील व्हाईट कॉलर गुन्हेगारांच्या टोळीचाच कॉंग्रेस पक्षात प्रवेश झाल्याची चर्चा रंगली आहे.

