महिला सबलीकरण आणि कुपोषणमुक्त जिल्हा हेच ध्येय.. (अनुराधा चव्हाण, महिला व बाल कल्याण सभापती, भाजप, औरंगाबाद जिल्हा परिषद) - Women empowerment and malnutrition free district is the goal  | Politics Marathi News - Sarkarnama

महिला सबलीकरण आणि कुपोषणमुक्त जिल्हा हेच ध्येय.. (अनुराधा चव्हाण, महिला व बाल कल्याण सभापती, भाजप, औरंगाबाद जिल्हा परिषद)

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

आमच्या किनगावातून सामाजिक कामांना सुरवात केली. कृषी, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामस्वच्छता या पंचसूत्रीचा वापर करत कामाला सुरवात केली. पवार आणि पोळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि एका चांगल्या कामाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

माहेरी आणि सासरी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना सामाजिक कामांच्या माध्यमातून मी राजकारणात ओढली गेले. राजकीय वारसा नसला तरी सामाजिक वारसा आमच्या दोन्ही कुटुंबामध्ये होता.

पती शासकीय नोकरीत असल्याने सातारा येथे असताना आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार, पाणी फाउंडेशनचे  डॉ. अविनाश पोळ यांच्याशी संपर्क आला. ग्रामीण भागात त्यांनी केलेले काम खूप मोठे आहे. आदर्श आणि समृद्ध गांव कसे असावे या दोघांनी दाखवून दिले आहे. त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि आपणही आपल्या गावांत, परिसरात अशा प्रकारचे काम उभे करून लोकांना मदत करावी असे ठरवले.

सामाजिक बांधिलकी आणि समाज सेवा या उद्देशाने शांतीब्रम्ह प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. आमच्या किनगावातून सामाजिक कामांना सुरवात केली. कृषी, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामस्वच्छता या पंचसूत्रीचा वापर करत कामाला सुरवात केली. पवार आणि पोळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि एका चांगल्या कामाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

किनगाव आदर्श व समृद्ध करण्याचा विडा आम्ही उचलला आणि शांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रामुख्याने जलसंधारणाची कामे हाती घेतली. पंचसूत्री कार्यक्रम आखून काम सुरू केले तेव्हा आमच्या गावाचा भौगोलिक विचार करता हा सगळा परिसर डोंगराळ आहे. त्यामुळे या भागात सातत्याने दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष या समस्या जाणवत होत्या. पाणी नाही म्हणून शेतकऱ्यांना कसेबसे एक पीक घेता यायचे, पण त्यात देखील अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यावर मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे हाती घेऊन या समस्येवर आम्ही मात केली. पाझर तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ काढल्यामुळे या तलावाची पाणी पातळी वाढली. शिवाय तलावातील गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतांमध्ये टाकल्यामुळे जमीन सुपीक होण्यास देखील मदत झाली.

आज जिथे शेतकऱ्यांना या भागात एक पीक घेणे शक्य नव्हते, तिथे दोन-तीन पिकं शेतकरी घेऊ शकत आहेत. आता शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले, मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध झाल्या. जलसंधारणाचे चांगले काम आम्ही करू शकलो, याची दखल पाणी फाउंडेशनने घेऊन प्रशस्तिपत्र देत आमचे कौतुक केले होते. खामखेडा, धोंडखेडा, चौका भागात जिथे माणसाला प्यायला पाणी नाही, अशा भागात आम्ही मोफत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला. अगदी शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचवले. माणसांप्रमाणेच शेतकऱ्याचे पशुधन जगवण्याचे देखील मोठे आव्हान होते. त्यासाठी ठिकठिकाणी चारा छावण्या निर्माण केल्या आणि दुष्काळाच्या काळात देखील पशुधन जगवले. शहरातील सिडको बसस्थानक, हर्सुल टी पाॅईट येथे पाणपोई सुरू करून अनेकांची तहान भागवली, लोकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले.

शांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही एकएक पाऊल पुढे टाकत गेलो. आखलेल्या पंचसुत्रीवर लक्ष केंद्रित केल्याने जे उदिष्ठ डोळ्यासमोर ठेवले ते साधता आले. महिला सक्षमीकरण हा त्यातील एक महत्त्वाचा भाग होता. व्यवसाय, नोकरीच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून आम्ही पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागातील महिला व तरूणांनी मोठ्या प्रमाणावर या संधीचा लाभ घेतला आणि तिचं सोनं केलं. प्रतिष्ठानच्या मदतीने पोलिस प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सात महिला आणि दोन पुरुष पोलिस भरतीत यशस्वी ठरले आहेत. आपण केलेल्या कामाचे फळ जेव्हा मिळते तेव्हा त्याचे समाधान मोठे असते. याचा अनुभव आम्ही घेत आहोत. या शिवाय महिलांना सक्षम करण्यासाठी शिलाई मशिनचे प्रशिक्षण, बचत गटांची स्थापना करून त्यांना गृहउद्योग व विविध कामासाठी मदत करून स्वतःच्या पायावर उभे केले.

सामाजिक कामातून राजकारणात प्रवेश..

शांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असलेल्या कृषी, जलसंधारण, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य या कामांचे चांगले परिणाम दिसत होते. अनेक गावामधून अशा प्रकारची कामे आमच्याकडेही करा, अशी मागणी होत होती. यासाठी
मी राजकारणात यावे, अशी मागणी लोकांकडूनच होऊ लागली. राजकारणाच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक काम मोठ्या प्रमाणात करू शकता, त्याचा लाभ अनेकांना होऊ शकतो अशी सगळ्यांची धारणा होती. आम्हालाही या कामाला
व्यापक स्वरूप द्यायचे होते. त्यामुळे लोकांची इच्छा आणि सामाजिक कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढले आणि निवडून आले.

शांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम सुरू असतानाच जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझ्या सर्कलमध्ये मला वैयक्तिक लाभाच्या योजना, रस्ते, पाणी पुरवठ्याच्या योजना, शौचलाये, शाळेच्या इमारती बांधणे यासह अनेक योजना राबवता आल्या. आदर्श गावासाठी ज्या मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्व गोष्टींची पुर्तता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्याचा मी प्रयत्न केला. शिक्षणाचे महत्त्व आणि ग्रामीण भागातील मुलांच्या गरजा लक्षात घेऊन मी सर्कलमधील २५ गावांमधील विद्यार्थ्यांना मोफत दप्तराचे वाटप केले. एक- दोन गावामध्ये ग्रामपंचायतींचे कार्यालय वगळता संपूर्ण सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे करता आली.

जनतेने कामाची पावती दिली..

प्रामाकिपणे केलेल्या सामाजिक कामाची दखल लोक घेत असतात. याची प्रचिती मला दुसऱ्यांदा जेव्हा मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली तेव्हा आली. निवडणूक म्हटलं की गावोगाव प्रचार, बैठका, सभा हे चित्र असते. पण शांती प्रतिष्ठान आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून पहिल्या टर्ममध्ये मी केलेली कामे लोकांसमोर होती. त्यामुळे मला लोकांमध्ये जातांना कुठलीच अडचण आली नाही. फारशा सभा, दौरे देखील घ्यावे लागले नाही. लोकांनी मला दुसऱ्यांदा तब्बल साडेपाच हजार मतांनी निवडून दिले. मी केलेल्या कामाची ही पावती होती, अर्थात जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे जबाबदारी देखील वाढली होती. लोकांसाठी आणखी चांगले काम करण्याची ऊर्जा मला या दुसऱ्या विजयाने मिळाली.

तुमच्या चांगल्या कामाची दखल जशी जनता घेते, तशीच पक्षही घेत असतो. जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी केलेले काम पाहून भाजपने मला महिला व बाल कल्याण सभापती पदावर काम करण्याची संधी दिली. या संधीच सोनं करून आपल्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी अधिक सक्षमपणे पार पाडण्याचा मी निर्धार केला. जिल्ह्यातील कुपोषणाचे वाढते प्रमाण पाहता जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू केली आहे. वर्षाच्या सुरवातीला पक्षाने माझ्यावर सभापती म्हणून जबाबदारी टाकली आणि कामाला सुरवात करत नाही तोच मार्च महिन्यात देशावर आणि राज्यावर कोरोना या जागतिक महामारीचे संकट ओढवले. सहा महिन्यांहून अधिक लॉकडाऊन असल्याने फारसे काम करता आले नाही. पण याही काळात गोर-गरीब आणि गरजूंना दोन महिने पुरेल एवढे धान्य, किराणा सामान आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप करत दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

रॉकेट लर्निगचा अभिनव प्रयोग..

कोरोनाच्या संकटामुळे जिल्हा परिषदेला निधी नव्हता, पण महिला बाल कल्याण विभाग असा आहे की ज्याचे काम निरंतर सुरू असते. बालसंगोपन, शिशू आहार सारख्या गोष्टी सुरूच ठेवाव्या लागतात. यासाठी आमच्या अंगणवाडीसेविका, मदतनीस संपूर्ण स्टाफ, महिला बाल कल्याणचे अधिकारी, सीडीपीओ अशा सगळ्यांचा एक व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार केला आणि त्या माध्यमातून आम्ही ऑनलाईन संपर्कात राहिलो. अनेक मीटिंग घेतल्या आणि लॉकडाऊनच्या काळातही बालसंगोपन आणि शिशू आहाराचे काम सुरू ठेवले.

बालसंगोपनासोबत आपण मुलांच्या शिक्षणाकडेही या काळात लक्ष दिले. त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये, सातत्य कायम राहावे, यासाठी विभागामार्फत आम्ही रॉकेट लर्निंगच ऑनलाईन उपक्रम राबवला. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांची लय बिघडू नये यासाठी ई. रॉकेट लर्निगचा प्रयोग राबविणारी राज्यातील बहुधा आपली जिल्हा परिषद पहिली असेल. व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून आपण मुलांच्या शिक्षणात खंड न पडू देता त्यांच्या कविता, अभ्यास सुरू ठेवला.

आता परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे, त्यामुळे आमच्या कामालाही गती येईल. महिला बाल कल्याण सभापती म्हणून महिलांना सक्षम करणे हाच प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे या विभागाकडून महिलांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात आमूलाग्र बदल करण्याचा विचार आहे. आतापर्यंत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणातून फार काही साध्य होते असे दिसत नाही. त्यामुळे यापुढे शेती पूरक व शेती मालावर प्रक्रिया करण्यासाठीचे प्रशिक्षण महिलांना देण्याचा उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार असून लवकरच त्याला मान्यता घेऊन काम सुरू करण्यात येईल.

महिलांसाठी काम करत असताना बेटी बचाव, बेटी पढाव हा जो केंद्र सरकारचा राष्ट्रीय उपक्रम आहे, तो प्रभावीपणे राबवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. केवळ भिंती रंगवून किंवा पत्रक वाटून या अभियानाचे उदिष्ठ साध्य होणार नाही. त्यासाठी मुलींचा जन्मदर कसा वाढेल यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. दोन मुलींच्या जन्मानंतर ज्या कुटुंबांनी ऑपरेशन केले, अशा कुटुंबाचा सत्कार करण्याचे आपण ठरवले. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन आणि बेटी बचाव, बेटी पढाव या अभियानाच्या जनजागृतीचे स्वरूप बदलण्याचा आपला प्रयत्न आहे. मुलींना दप्तराचे वाटप करून त्यावर बेटी बचाव बेटी पढाव अभियानाची जाहिरात किंवा जनजागृती केली जाणार आहे. या शिवाय ग्रामीण भागातील घरांची मालकी पती बरोबरच पत्नीकडेही असावी, या राज्य सरकारच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी महिला बाल कल्याण विभागाने ठराव मंजूर केला. व या कामाला गती देऊन ग्रामपंचायत अंतर्गत घरांची मालकी पत्नीकडेही असावी, यासाठी पुढाकार घेतला.

पक्षपातळीवर संधी आणि भरीव काम..

जिल्हा परिषद सदस्य आणि आता महिला बाल कल्याण सभापती म्हणून काम करत असताना पक्षाने देखील माझ्या चांगल्या कामाची वेळोवेळी दखल घेतली. प्रभारी महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून मी अनेक उपक्रम राबवले. महिलांच्या नियमित बैठका घेऊन विविध प्रश्नांवर आंदोलन किंवा पक्षाने ठरवून दिलेले कार्यक्रम यशस्वी केले. राखी पौर्णिमा निमित्त तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून राख्या पाठवण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला होता. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. एक वर्ष डॅा. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली.

त्याकाळात मराठवाड्यात मोठा दुष्काळ पडला होता. त्यामुळे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या राहण्याचा आणि जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. विद्यार्थी एकवेळच जेवण करत असल्याची बातमी मी वाचली. दुष्काळामुळे
विद्यार्थ्यांना घरून येणारी मदत बंद झाली आणि त्यांच्यावर मोठे संकट ओढवले. तेव्हा सिनेट सदस्य म्हणून मी एका बैठकीत या विद्यार्थ्यांसाठी काही तरी करण्याचा प्रस्ताव ठेवला. विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी मी वैयक्तिक ५० हजार रुपयांची मदत केली, आणि त्यानंतर अनेकजण मदतीसाठी पुढे आले आणि विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न मिटला. सिनेट सदस्यपदाचा काळ संपत नाही तोच, पुन्हा महाराष्ट्र पशू व मत्स्य विद्यापीठ नागपूर येथे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून मला
काम करण्याची संधी मिळाली.

कुटुंबाचा भक्कम पाठिंबा...

महिला म्हणून राजकारण, समाजकारण करत असताना कुटुंबाची देखील महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर आहे. ती देखील मी तितक्याच सक्षमपणे पार पाडते. माझ्या राजकीय आणि समाजसेवेच्या कामात मला माझे पती, मुले आणि एकूणच संपूर्ण कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळाला. त्यांच्या पाठिंब्या शिवाय मला हे काम करणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. कुटुंबाचा पाठिंबा असेल तर तुम्हाला समाजसेवा करण्यासाठी ऊर्जा मिळते. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी तुमच्या कुटुंबाची साथ असणे अत्यंत आवश्यक असते आणि सुदैवाने मला ती मिळाली आहे.

मला वाटत आपण समाजात बदल घडवण्यासाठी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे असं नेहमीच बोलत असतो. समाजसेवेचा राजकारणाची जोड मिळाली तर ते काम अधिक वेगाने आणि परिणामकारक होते असा माझा अनुभव आहे. त्यामुळे समाजात बदल घडवू इच्छिणाऱ्या महिला, तरुणींनी निश्चितच राजकारणात आलं पाहिजे. तुमच्या चांगल्या कल्पना, विचारांना चालना देऊन ते प्रत्यक्षात उतरवण्याचे राजकारण हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे नव्या पिढीने राजकारणाकडे सकारात्मक दृष्टीने पहावे आणि या क्षेत्रात उतरावे, असे मला वाटते.

(शब्दांकन : जगदीश पानसरे)

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख