औरंगाबाद नामांतराबाबत अजित पवार म्हणाले...  - Regarding the renaming of Aurangabad, Ajit Pawar said ramdas athavale | Politics Marathi News - Sarkarnama

औरंगाबाद नामांतराबाबत अजित पवार म्हणाले... 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 4 जानेवारी 2021

औरंगाबादच्या नामांतरावरून निर्माण झालेल्या वादावर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे एकत्र बसून मार्ग काढतील.

मुंबई : काही लोक जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर पडावं, यासाठी प्रश्न निर्माण करत आहेत. आघाडीतील तीनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरिता एकत्र आलेले आहेत. औरंगाबादच्या नामांतरावरून निर्माण झालेल्या वादावर आमच्या तिन्ही पक्षांचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे एकत्र बसून मार्ग काढतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

अजित पवार म्हणाले, ''महाविकास आघाडीतील तीनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरिता एकत्र आलेले आहेत. यासाठी आम्ही समान कार्यक्रम आखलेला आहे. तो कार्यक्रम राबवत असताना त्यामध्ये कधीतरी असा प्रसंग येतो आणि त्यातून आम्ही सामोपचाराने मार्ग काढू.''

औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्यास रिपब्लिकन पक्षाचा विरोध राहील, असे या पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी काल ट्वीट करुन जाहीर केले आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही या नामांतराला विरोध केला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. यावरून राजकीय पक्षांमध्ये कलगीतुला देखील रंगला आहे. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पत्रकार परिषदेत औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याला आमचा ठाम विरोध असेल, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार ज्या समान कार्यक्रमाच्या आधारावर सत्तेत आले आहे, त्यामध्ये शहराचे नाव बदलण्याचा भाग नाही. आज इथे आल्यानंतर मला हा विषय समजला. एखाद्या शहराचे नाव बदलून सर्वसमान्यांचा विकास होत नाही. त्यामुळे औरंगाबादचे संभाजीनगर असे नाव बदलण्यास आमचा विरोध राहील. या संदर्भातला विषय कधीही परस्पर घेतला जाणार नाही, जेव्हा केव्हा हा विषय आमच्या समोर येईल, तेव्हा आमचा त्याला ठाम विरोध असले, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे महसुल मंत्री तथा काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे. 

दुसरीकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत राज्य सरकारला सल्ला दिला आहे.  कुठल्याही शहराचं नामकरण करण्यासाठी महापालिकेचा प्रस्ताव, राज्य सरकारची मंजुरी आणि मग केंद्राची मान्यता अशी प्रक्रिया आहे. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करायच असेल, तर महापालिका तुमची आहे तिथे ठराव करा, राज्याच्या कॅबिनेटला निर्णय द्या, असे ट्वीट त्यांनीकेले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख