प्रीतम मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत पंकजा मुंडे यांनी केले भाष्य  - Pankaja Munde reveals about Pritam Munde's ministerial post | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

प्रीतम मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत पंकजा मुंडे यांनी केले भाष्य 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 जुलै 2021

प्रीतम मुंडे यांच्याही नावाची चर्चा होती.

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपदाची संधी मिळणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून दिल्ली आणि राज्यात रंगली होती. मात्र, मंत्रिमंडळातील समावेशासाठी प्रीतम मुंडे यांचे नाव आघाडीवर असून शपथविधीसाठी त्या दिल्लीत दाखल झाल्या आहेत, असे सांगितले जात होते. मात्र, प्रीतम यांच्या मोठ्या भगिनी अणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्याबाबत ट्विट करत प्रीतम मुंडेंच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाबाबत भाष्य केले आहे. (Pankaja Munde reveals about Pritam Munde's ministerial post)

पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली. ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी, प्रीतमताई आणि आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबईच्या निवासस्थानी आहोत. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : विधानसभा अध्यक्षाची निवड न केल्याने काँग्रेस श्रेष्ठी नाराज : पटोले, थोरातांकडे होणार विचारणा

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा रंगली होती. त्यात महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, हिना गावीत यांच्याबरोबरच प्रीतम मुंडे यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र, दोन दिवसांपासून प्रीतम मुंडे आणि हिना गावित यांचे नाव मागे पडून भागवत कराड आणि भारती पवार यांचे नाव पुढे आले. साहजिकच गावीत आणि मुंडे यांचे मंत्रीपदाचे स्वप्न भंगले. पण, त्याबाबत खुद्द पंकजा मुंडे यांनीच प्रीतम यांच्या केंद्रीय मंत्रीपदाबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा : दानवे, धोत्रे यांच्यासह सात मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. कालपासून एकूण सात मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 
 
पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि फेररचनेत सुमारे 43 मंत्री आज शपथ घेतील. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल सरकारमधून बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या आहेत. 

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक, कामगारमंत्री संतोषकुमार गंगवार, रसायन मंत्री सदानंद गौडा आणि महिला व बाल कल्याण राज्यमंत्री देबश्री चौधरी यांच्यासह अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे, शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कालच थावरचंद गेहलोत यांनी केंद्रीय मंत्रिपदावरुन राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. कालपासून एकूण सात मंत्र्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख