आता पंकजा मुंडे आमच्या नेत्या : डॉ भागवत कराड  - Now Pankaja Munde is our leader :  Dr. Bhagwat Karad | Politics Marathi News - Sarkarnama

आता पंकजा मुंडे आमच्या नेत्या : डॉ भागवत कराड 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 जुलै 2021

या भेटीत डॉ. कराड यांनी (स्व.) गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

नवी दिल्ली : डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ह्या नाराज असल्याची चर्चा राज्यात सुरू असतानाच  केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी आज (ता. १२ जुलै) दिल्लीत पंकजा यांची भेट घेत त्यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. या वेळी डॉ. कराड यांनी ‘गोपीनाथ मुंडे साहेब आमचे नेते होते, आता पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत,’ अशा शब्दांत कराडांनी भावना व्यक्त केल्या. (Now Pankaja Munde is our leader :  Dr. Bhagwat Karad)

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात डॉ. प्रीतम मुंडे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, शेवटच्या दोन दिवसांत त्यांचे नाव मागे पडले आणि डॉ भागवत कराड यांना मंत्रिपदाची 
लॉटरी लागली. डॉ. कराड यांच्यामुळे प्रीतम मुंडे यांची मंत्रीपदाची संधी हुकली, अशी भावना मुंडे समर्थकांमध्ये तयार झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि डॉ. कराड यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. डॉ. कराड ह्यांची  (स्व.) गोपीनाथ मुंडे ह्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख आहे. परंतु मुंडे भगिनींना डावलून वंजारी समाजातील डॉ. कराड यांना भाजप नेतृत्वाकडून पुढे आणले जात आहे, अशी चर्चा मुंडे समर्थकांमध्ये सुरू आहे. 

हेही वाचा : काँग्रेस आमदाराचे पुत्र झेडपी अध्यक्ष होताच भाजपच्या गोटात पसरला आनंद!

डॉ. प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात समावेश न होऊनही पंकजा मुंडे यांनी नाराजी न दाखवता पत्रकार परिषदेत आपण पक्षावर नाराज नसल्याचे म्हटले हेाते. तसेच, डॉ. कराड यांचा शपथविधीच्या आदल्यादिवशी फोन आल्याचे सांगितले हेाते. एकीकडे पंकजा मुंडे नाराजी दाखवत नसल्या तरी बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकांमध्ये मात्र अस्वस्थता दिसून येत होती. त्याचा परिणाम म्हणून आतापर्यंत सुमारे ८० पक्ष पदाधिकाऱ्यांनी नाराजी दाखवत आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यात काही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा समावेश आहे.

समर्थकांकडून राजीनामस्त्र उगारले जात असताना पंकजा मुंडे ह्या दोन दिवसांपूर्वी दिल्लीत दाखल झाल्या होत्या. पक्षाच्या सचिवांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक घेतली. तिला उपस्थित राहण्यासाठी त्या दिल्लीत दाखल झाल्या होत्या. त्यामुळे त्यांची आणि डॉ. कराड यांची भेट हेाते का नाही, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेली पंकजा मुंडे आणि डॉ. भागवत कराड यांची अखेर आज (ता. १२ जुलै) दिल्लीत भेट झाली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. या भेटीत डॉ. कराड यांनी (स्व.) गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. दोघांनी तासभर गप्पा मारल्या. त्यावेळी ‘(स्व.) गोपीनाथ मुंडे साहेब आमचे नेते होते, आता पंकजा मुंडे आहेत,’ अशा शब्दांत कराड यांनी भावना व्यक्त केल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख