डॉ. लहानेंना त्रास देणारे गिरीश महाजन आहेत का...? दरेकर म्हणतात...  - Is Girish Mahajan harassing Dr. Tatyarao Lahane ...? Praveen Darekar says ... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

डॉ. लहानेंना त्रास देणारे गिरीश महाजन आहेत का...? दरेकर म्हणतात... 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

भाजप कोणतीही फिक्‍सिंग करीत नाही. त्यांच्या वक्तव्यावर पक्षात चर्चा केली जाईल. 

लातूर : "वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी प्रशासनातील बाबींवर जाहीर भाष्य करणे चुकीचे आहे. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी भाजपकडून नव्हे; तर एका व्यक्तीकडून त्रास झाल्याचे सांगितले आहे, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. त्यावर "ही व्यक्ती माजी मंत्री गिरीश महाजन आहेत का?' या पत्रकारांच्या प्रश्नावर मात्र "मला माहीत नाही. पण, त्या व्यक्तीचा मीही शोध घेत आहे' असे सावध उत्तर दरेकर यांनी दिले. 

भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात मला त्रास झाला, असे वक्तव्य वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केले होते. त्याबाबत प्रवीण दरेकर यांनी डॉ. लहानेंच्या विरोधात उघडपणे भाष्य करत एवढ्या वरिष्ठ पदावरील व्यक्तींने राजकारण्यांसारखे असे जाहीरपणे भाष्य करणे योग्य नाही, अशी टीका केली होती. त्यानंतर आज लातूरच्या दौऱ्यावर असलेले दरेकर यांना त्याबाबत विचारले असते, त्यांनी वरील उत्तर दिले. 

सत्तेसाठी शिवसेनेचे हिंदुत्व पातळ झाले 

हिंदुत्वाबाबत भाजपची भूमिका ठाम आहे; पण सत्तेसाठी शिवसेनेने धर्मनिरपेक्ष पक्षाशी हातमिळवणी केली. राममंदिरापेक्षा त्यांना आता सत्ता महत्त्वाची वाटू लागली आहे. सत्तेसाठी त्यांचे हिंदुत्व पातळ झाल्याची टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली होती. राम मंदिरासाठी शिवसेना आक्रमक होती. आता राम मंदिराची उभारणी होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तिकडे गेलेही नाहीत. त्यांना राम मंदिरापेक्षा सत्ता महत्त्वाची वाटू लागली आहे. हिंदुत्व हे कृतीतून दाखवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. 

वॉटर ग्रीड प्रकल्प महाआघाडी सरकारने गुंडाळला 

मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी भाजपच्या काळात "वॉटर ग्रीड' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी देऊन पैशांची तरतूद केली. महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवला आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून हा प्रकल्प मार्गी लावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

सरकारला संवेदनाच नाहीत 

राज्य सरकारने दारूवरील शुल्क माफ केले, बिल्डर्सचे शुल्क माफ केले; पण कोरोनाकाळातील वीजबिल माफ केले जात नाही. उलट जास्तीची बिले पाठवली गेली. सक्तीने वसुली केली जात आहे. गोरगरिबांची पिळवणूक करणारे हे सरकार आहे. या सरकारला संवेदनाच नाहीत. या पुढील काळात सक्तीने वसुली केली तर ग्राहकांना वीजबिल भरू दिले जाणार नाही. जनतेसाठी जेलभरो आंदोलन केले जाईल, असा इशारा दरेकरांनी दिला. 

निलंगेकरांच्या फिक्‍सिंगच्या आरोपाची चर्चा होणार 

विधान सभेच्या लातूर ग्रामीणची जागा फिक्‍सिंग होती, अशी टीका आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली होती. यासंदर्भात दरेकर म्हणाले, निलंगेकर हे भाजपचे नेते असून त्यांनी एका कार्यक्रमात ही टीका केली होती; पण भाजप कोणतीही फिक्‍सिंग करीत नाही. त्यांच्या वक्तव्यावर पक्षात चर्चा केली जाईल. 

विजबिलमाफीसाठी आंदोलन करणार : निलंगेकर

शेतकरी, सामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारचा आंधळा कारभार सुरू असल्याची टीका आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. राजाच आंधळा असल्यामुळे प्रजेला अंधारात वावरावे लागत आहे. वीजबिलांबाबत सरकारने आठ-दहा दिवसांत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा जनतेला नाइलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल, जेलभरो आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला. शुक्रवारपासून (ता. पाच) जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात आंदोलन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, नागनाथ निडवदे, शहराध्यक्ष गुरुनाथ मगे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे आदी उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख