महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी पवारांवर : फडणवीसांचा चिमटा - Devendra Fadanavis Say Sharad Pawar is Defending MahaVikasAghadi | Politics Marathi News - Sarkarnama

महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी पवारांवर : फडणवीसांचा चिमटा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

अन्य राज्यांनाही मदतीची आवश्यकता आहे. मात्र,अन्य राज्यात महाराष्ट्रासारखा कांगावा दिसत नाही. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांत मतभेद आहेत. पण हात झटकण्यात तिन्ही पक्ष तरबेज आहेत. या एका बाबतीत त्यांचे एकमत आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे

उस्मानाबाद : ''पवारांसारखा जाणता नेता या राज्यात नाही. पण सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर आहे. त्यामुळे ते राज्याचा बचाव करताहेत. राज्याचा बचाव होईल, एवढेच ते बोलत आहेत,'' असा चिमटा माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना काढला. 

फडणवीस आज पूरस्थिती पाहणीच्या दौऱ्यावर आहेत. दौरा सुरु करण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौरे करत आहेत. यावेळी केंद्र सरकारवर मदतीबाबत टीका केली जात आहे. आज फडणवीस यांनी या नेत्यांना प्रत्युत्तर दिले. 

फडणवीस यावेळी म्हणाले, "काही झाले की केंद्राकडे टोलवायचे असे चालले आहे. खरेतर पंतप्रधानांनी स्वतः फोन करुन उद्धवजींना सांगितले की या आपत्तीत आम्ही सोबत आहोत. पवार साहेबांनी सांगितले की मदत मिळायला एक दीड महिना जाईल. आता खरेतर केंद्राची मदत कधी येते याची कल्पना पवार साहेबांना आहे. केंद्रात समितीचे प्रमुख गृहमंत्री व सदस्य कृषीमंत्री असतात. पहिल्यांदा राज्य सरकारला अंदाज द्यावा लागतो. नंतर टीम येते व ती केंद्राला रिपोर्ट सादर करते. ही अनेक वर्षांची पद्धत आहे. जेव्हा पवार कृषीमंत्री होते तेव्हाही हीच पद्धत होती. आजही आहे,''

फडणवीस पुढे म्हणाले, "मदतीसाठी आवश्यकता असेल तर कर्ज काढले पाहिजे, असा सल्ला पवार यांनी दिला आहे. कर्ज काढणे म्हणजे खूप मोठे पाप नाही. १ लाख २० हजार कोटींचे कर्ज आपल्याला काढता येते. आपण आतापर्यंत फक्त ६०  हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. कर्ज घेऊन देखिल अडचणी सोडवता येतील. राज्याची पत चांगली आहे. त्यामुळे कर्ज घेऊन आता मदत केली तर नंतर केंद्राकडून निधी येणारच आहे,"

''राज्याने एनडीआरएफमधून किंवा बजेटमधून पैसा खर्च करायचा असतो. मग केंद्राकडून परतावा मिळतो. मदत भरघोसच मिळणार आहे. मी अमित शहा यांच्याशी बोललो आहे. मी बोललो काय आणि उद्धवजींनी केली काय मदत मिळणारच आहे. केंद्राने  जीएसटी संदर्भात २० हजार कोटी रुपये मार्चपर्यंतचे दिले. राज्यात जमा होऊन एक हिस्सा केंद्राला जातो. पण केंद्रालाही तो मिळालेला नाही. तरीही कन्साॅलिडेटेड फंडमधून केंद्राने राज्यांना पैसे दिले आहेत,'' असाही दावा फडणवीस यांनी केला.

फडणवीस पुढे म्हणाले, "आता केंद्र सरकार एक लाख कोटींचे कर्ज घेऊन जीएसटीचा हिस्सा वाढीसह देणार आहे. जर राज्याने पदरचा पैसा खर्च केला तरी तो परत येणार आहे. केंद्राकडे कर जमा होतो त्याचा ४२ टक्के हिस्सा राज्यांना मिळतो. पण केंद्राने भूमीका घेतली की कर जमा झाला नाही तरी आम्ही राज्यांना हिस्सा देऊ
केंद्रावरही संकट आहेच. तरी केंद्र सरकार मदत करणारच आहे,'' 

हात झटकण्यात आघाडीत एकमत
''अन्य राज्यांनाही मदतीची आवश्यकता आहे. मात्र,अन्य राज्यात महाराष्ट्रासारखा कांगावा दिसत नाही. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांत मतभेद आहेत. पण हात झटकण्यात तिन्ही पक्ष तरबेज आहेत. या एका बाबतीत त्यांचे एकमत आहे,'' असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख