BREAKING भाजपचे ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांचा पक्षाला रामराम - BJP Leader Jaysingrao Gaikwad Resigns From Party | Politics Marathi News - Sarkarnama

BREAKING भाजपचे ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांचा पक्षाला रामराम

जगदीश पानसरे
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी आज भाजपचा त्याग केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र पाठवून आपल्याला पक्षात योग्य सन्मान मिळत नसल्याची खंत व्यक्त करत जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.  

औरंगाबाद : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी आज भाजपचा त्याग केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र पाठवून आपल्याला पक्षात योग्य सन्मान मिळत नसल्याची खंत व्यक्त करत जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.  

जनसंघा पासून तर आताच्या भाजपपर्यंत पक्षात सक्रिय राहिलेले,  केंद्रात दोनवेळा राज्यमंत्री, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात दोनदा आमदार म्हणून काम केलेले व पक्षाच्या मराठवाड्यातील जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे जयसिंग गायकवाड भाजपमधून बाहेर पडल्यामुळे पक्षाला हा मोठा धक्का समजला जातो.

 मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आता प्रयोग थांबवा हा मतदारसंघ भाजपचा आहे, तो पुन्हा खेचून आणायचा असेल तर मला संधी द्या, असे म्हणत जयसिंगराव गायकवाड यांनी पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता.  

पक्षाने दखल न घेतल्यामुळे नाराज झालेल्या जयसिंग गायकवाड यांनी आज अखेर सकाळीच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मेलवर पत्र पाठवून आपण पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे म्हंटले आहे. तसेच पदवीधर मतदारसंघात दाखल केलेला उमेदवारी अर्ज आपण आज मागे घेणार असल्याचेही जयसिंगराव गायकवाड यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

"पक्षात राहून काय करू 

भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर जयसिंगराव गायकवाड म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून मी पक्षाकडे जबाबदारी मागत होतो. अनेक वेळा वरिष्ठ नेत्यांची ई-मेलद्वारे पत्रव्यवहार केले, फोन केले पण माझे फोन घेतले गेले नाही. मग अशा पक्षात राहून मी काय करू?  शहरात राज्यस्तरावरचे नेते येऊन जातात, पण कधी मला बोलावले जात नाही, सन्मानाची वागणूक दिली जात नाही, मग या पक्षात राहून मी काय करू असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पडतो.मराठवाड्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यानंतर भाजपला वाढवण्याचे काम मी केलं,'' असे ते म्हणाले.

"मुंडे-महाजन नेहमीच आपल्या भाषणातून जयसिंगराव गायकवाड हे भाजपचे प्रोड्युसर आहेत असं सांगायचे. आम्ही त्यांनी तयार केलेले उत्पादन मार्केटमध्ये विकतो, मार्केटिंग करतो, असे ते मोठेपणाने सांगायचे. महाराष्ट्रात भाजप खिळखिळी झाली आहे, त्याची बांधणी करण्याची तयारी मी पक्षाकडे दाखवली होती.  मात्र पक्षाकडून मला कुठल्याही प्रकारची संधी किंवा सन्मानाची वागणूक दिली गेली नाही. त्यामुळे आता या पक्षात राहण्यात अर्थ नाही,''असेही ते म्हणाले

भाजप बाजारात विकायला काढली का?

भाजप पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर जयसिंगराव गायकवाड यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे,  जयसिंगराव गायकवाड पक्षातून गेल्यानंतर आता पक्ष काय तुम्ही बाजारात विकायला काढला आहे का? असा सवाल जयसिंगराव यांनीनी उपस्थित केला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख