विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा बाळापूरच्या शिवसेना आमदारांनाच 'दे धक्का' (व्हिडिओ)

शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनाही सोडले नाही. चक्क अकोला जिल्ह्यातील शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या चान्नी शाखेने धक्का देत चक्क त्यांच्या खात्‍यावर पीक कर्जाची उचल केली
Balapur MLA Nitin Deshmukh Alleges Fraud by Vidarbha Konkan Bank officials
Balapur MLA Nitin Deshmukh Alleges Fraud by Vidarbha Konkan Bank officials

अकोला : शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनाही सोडले नाही. चक्क अकोला जिल्ह्यातील शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेच्या चान्नी शाखेने धक्का देत चक्क त्यांच्या खात्‍यावर पीक कर्जाची उचल केली. आमदारांना कर्जमाफी नसतानाही कर्जमाफीच्या यादीत आमदार देशमुख यांचे नाव आल्यानंतर हा सर्व घोटाळा उघडकीस आला. रविवारी (ता.३१) आमदारांनीच पत्रकार परिषद घेवून बँकेच्या या घोटाळ्याची पोलखोल केली.

शिवसेनेचे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांचे पातूर तालुक्यातील चान्नी येथील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेत पीक कर्जाचे खाते होते. तेव्हा ते जिल्हा परिषद सदस्य होते. त्‍यांच्या पीक कर्ज खात्याबाबत २९ मे २०२० रोजी शाखा प्रबंधक संतोष मगनलाल तापडिया यांनी दिलेल्या माहितीतून पीक कर्ज खात्यातील धक्कादायक माहिती पुढे आली.

देशमुख यांनी १३ मे २०१३ रोजी एक लाख रुपये कर्ज घेतले होते. त्याचे व्याजासह एक लाख २७ हजार २८ ऑगस्ट २०१६ परतफेड केली. त्यानंतर त्यांच्या खात्यावर शिल्लक असलेली रक्कम ३६५७ रुपये २० मार्च २०१७ रोजी भरण्यात आली. कर्जखाते नील झाल्याने ते बँकेच्या नियमानुसार बंद करणे अपेक्षित होते. मात्र ते करण्यात आले नाही. कर्ज खाते नील झाल्यानंतर देशमुख यांच्या खात्यातून व्यवहार झाले. बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पीक कर्ज उचलण्यात आले.

७० हजार रुपये उचल केल्यानंतर त्यातील ६० हजार रुपये परत खात्यात जमा करण्यात आले. कर्ममाफीच्या यादीत आधार लिंक नसलेल्या खात्‍यात देशमुख यांचे नाव आल्यानंतर हा सर्व घोटाळा उघडकीस आला. या व्यवहारासाठी बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी कैलास बद्रिलाल अग्रवाल व सहाय्यक प्रबंधक शैलेंद्र सुरेंद्र खोब्राकडे यांच्यावर आमदार नितीन देशमुख यांनी आरोप केले आहेत.

बँकेनेही या प्रकरणाची चौकशी करून वरिष्ठ कार्यालयाकडे कारवाईसाठी प्रस्ताव पाठविला असल्याचे शाखा प्रबंधक तापडिया यांनी त्यांच्या पत्रात सांगितले आहे. या पत्रकार परिषदेला आमदार देशमुख यांच्यासह उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर, दिलीप बोचे, विकास पागृत, शहर प्रमुख अतुल पवणीकर, उमेश जाधव, बबलू देशमुख आदींची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणीही खाल्ले

विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेच्या चान्नी शाखेत मोतीराम संपत मावळकर यांचे पीक कर्ज खाते होते. त्यांचा २७ जून २०१८ रोजी मृत्यू झाला. त्यांच्या खात्यात ८ जून २०१८ रोजी पीक विम्याचे ३०६१० जमा झाले होते. त्यातून ७ ऑगस्ट रोजी म्हणजे, खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर ३६ हजार रोख रक्कम काढण्यात आली. बँकेत याबाबत कोणतेही व्हाऊचर आढळले नाही. या व्यवहाराचा ठपका चौकशीत कैलाश अग्रवाल व सहायक प्रबंधक कृष्णकांत मधुकर बोरकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यावरून आरोपींनी मृत शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणीही खाल्ले असल्याचे सिद्ध होते.

या शेतकऱ्यांनाही बसला फटका

पांग्रा येथील प्रकाश ओंकार जवाळे यांच्या बँक खात्यातून ९८ हजार रुपयांची उचल कोणत्याही व्हाऊचरशिवाय करण्यात आली. त्याच प्रमाणे शांताराम नारायण करणकार यांच्या पीक कर्ज पुनर्गठन खात्यातून ५० हजार ३००, कैलास पांडुरंग वांडे यांच्या खात्यातून ४० हजार ७७१ रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याच्या ठपका बँकेनेच केलेल्या चौकशीतून पुढे आला. यासारखे अनेक शेतकरी असून, कर्जखात्यात शिल्लक नसतानाही त्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत आली आहे. अशा शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन आमदार नितीन देशमुख यांनी केले आहे. हा घोटाळा चार कोटीच्या जवळपास असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांच्याकडे केली आहे.

बँकेची आरबीआयकडून करा चौकशी

बँकेतील व्यवहारांची चौकशी आरबीआयकडून व गैरव्यवहाराची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी बँकेकडून करण्यात आलेल्या पोलिस चौकशीत टाळटाळ करणारे ठाणेदार व बाळापूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांचीही चौकशी करण्याची मागणी आमदारांनी केली.             

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com