पुणे : रावसाहेब दानवे यांच्यासारखे दहा दानव तयार झाले तरी राज्यातील महाविकास आघाडीचे मानवतेचे सरकार पडू शकत नाही, अशा शब्दांत राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्या दोन महिन्यांत राज्य सरकार पडण्याचा वक्तव्याचा समाचार घेतला.
राज्यमंत्री बच्चू कडू हे परभणीत माध्यमांशी बोलत होते, त्या वेळी त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली. कडू म्हणाले की रावसाहेब दानवे हे केंद्रात मंत्री आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय करू शकता, हे सांगावे. राज्यातील महाविकास आघाडीबाबत दानवे यांनी विचार करू नये. रावसाहेब दानवे हे दानववृत्तीचे आहेत, त्यांनी सरकार पडण्याचा विचार सोडावा.
काय म्हणाले होते दानवे?
मराठवाड्यातील पदवीधर उमेदवाराच्या प्रचारात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येत्या दोन महिन्यांत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडेल, असे भाकीत केले होते. त्यावरून त्यांच्या शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्षाकडून सडकून टीका करण्यात येत आहे.
शरद पवारांनी उडवली खिल्ली
"रावसाहेब दानवे यांनी विधी मंडळ आणि संसदेत काम केलं आहे, त्यांचा हा गुण (ज्योतिष पाहणे) मला माहीत नव्हता.
उद्याचं चित्र सांगण्याची त्यांच्याकडे कला आहे, ज्योतिष शास्त्राचे जाणकार म्हणून मला त्यांचा परिचय नव्हता,' अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची खिल्ली उडवली.
भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी आज (ता. 24 नोव्हेंबर) पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी खास पुणेरी शैलीत रावसाहेब दानवे यांचा समाचार घेतला.
"महाराष्ट्रात येत्या दोन महिन्यांत भारतीय जनता पक्षाचे सरकार येणार आहे,' असं भाकीत केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी केलं होतं. त्याबाबत पवार यांना आज मुंबईत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळी पवारांनी वरील मिश्किल टिप्पणी केली.
दानवे यांना विधीमंडळात तसेच देशाच्या संसदेतही काम करताना मी पाहिले आहे. पण, ज्योतिष जाणत असल्याचा गुण मला माहीत नव्हता, असे पवार म्हणाले. "सामान्य माणूस बरोबर असल्यावर कुडमुड्या ज्योतिषाची गरज लागत नाही,' असे सांगून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असल्याचे अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा त्यांनी सांगितले.
Edited By Vijay Dudhale

