यवतमाळच्या पहिल्या किसान महापंचायतीवर कोरोनाचे सावट - Yavatmal Farmers Rally in Trouble due to Corona | Politics Marathi News - Sarkarnama

यवतमाळच्या पहिल्या किसान महापंचायतीवर कोरोनाचे सावट

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

वतमाळ येथील आझाद मैदानावर 20 फेब्रुवारीला (शनिवारी) होणाऱ्या राज्यातील किसान महापंचायतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, असे संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी काल सांगितले असले तरीही वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही महापंचायत होणार की नाही याबाबत प्रश्न  निर्माण झाला आहे

नवी दिल्ली :  दिल्लीच्या सीमांवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून महाराष्ट्रात यवतमाळ येथील आझाद मैदानावर 20 फेब्रुवारीला (शनिवारी) होणाऱ्या राज्यातील किसान महापंचायतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, असे संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी काल सांगितले असले तरीही महाराष्ट्र सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ, अकोला व अमरावतीमध्ये लाॅकडाऊन किंवा कर्फ्यू लावण्याच्या विचारात असल्याने या महापंचायतीच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दरम्यान अकोला जिल्‌हयात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने तेथील महापंचायत प्रशासनाच्या आवाहानानंतर स्थगित करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यावर अकोल्यात किसान महापंचायत घेण्यात येईल असा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला आहे.

दरम्यान, आज आपण अमरावती, अकोला व यवतमाळ या जिल्ह्यांचा कोरोना स्थितीचा आढावा घेतला असून या भागात कर्फ्यू अथवा लाॅकडाऊन लागण्याची शक्यता असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचीत केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही वेळात अधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार असून त्यानंतर याबाबतचा निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ही महापंचायत होईल किंवा नाही, याबाबत शंका आहे.

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत, चौधरी युध्दवीरसिंह आदी नेते सध्या देशाच्या विविध भागात किसान महापंचायतींना संबोधित करत आहेत. हरियाणा, उत्तर प्रदेश व राजस्थान येथे त्यांच्या महापंचायतींना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तीन कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी अनिष्ट असल्याने केंद्र सरकारने ते रद्द करावेत यासाठी या महापंचायती होत आहेत. मात्र त्यांचे स्वरूप अराजकीय आहे व यवतमाळ येथील सभेतही ते भान पाळण्यात येईल असे गिड्डे यांनी सांगितले आहे. या सभेसाठी राज्यभरातून किमान १ लाख शेतकरी उपस्थित राहतील असे नियोजन आयोजकांनी केले आहे.  

यवतमाळ हा सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. त्यामुळे येथील शेतकरी कृषी कायद्यांच्या अनिष्ट परिणामांबाबत सर्वाधिक जागरूक राहतील. आगामी काळात यवतमाळ भागात कोण्याही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये व व्यवस्थेच्या विरूध्दची लडाई शेतकऱ्यांनी यशस्वी करावी हा या महापंचायतीचा ठळक उद्देश असल्याचेही गिड्डे म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख