परमबीरसिंग यांच्या वतीने `कझिन`ने दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती... : पोलिस निरीक्षकाचा आरोप

या आरोपाची चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश
परमबीरसिंग यांच्या वतीने `कझिन`ने दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती... : पोलिस निरीक्षकाचा आरोप
parambirsngh

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या वतीने त्यांच्या `कझिन` म्हणवणाऱ्याने सुमारे दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती, अशी खळबळजनक तक्रार मुंबईचे पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी केली असून या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने पोलिस महासंचालक संजय पांडे यांना दिले आहेत.

अनुप डांगे यांची ही तक्रार दोन फेब्रुवारी 2020 रोजीची आहे. म्हणजे अॅंटिलिया येथे स्फोटके ठेवणे, मनसुख हिरेन हत्या, सचिन वाझे प्रकरण, परमबीरसिंग यांचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या हप्तेबाजीचा आरोप या साऱ्या घटनांच्या आधीची आहे. या तक्रारीची दखल गृह विभागाने घेतली असून त्याची चौकशी करण्याचा आदेश नुकताच दिला. परमबीरसिंग यांच्या विरोधात अकोल येथील निरीक्षक घाडगे यांनीही प्रचंड असे आरोप 26 एप्रिल रोजी केले आहेत. त्यामुळे या साऱ्या आरोपांचे काय होणार, याची आता उत्सुकता आहे. 

गांवदेवी पोलिस ठाण्यात निरीक्षक असलेले अनुप डांगे  यांनी दोन फेब्रुवारी 2020 रोजी याबाबत गृह सचिवांना पत्र लिहिले होते.  त्या पत्रात ते म्हणतात की त्यांच्या हद्दीत 22 नोव्हेंबर 2019 च्या रात्री एक बार बंद करण्यावरून बारमालक जितेंद्र ऊर्फ जितू नवलानी याने वाद घातला होता. आपले वरिष्ठ अधिकारी विशेषतः परमबीरसिंग यांच्याशी घरचे संबंध आहेत, असे तो सांगत होता. तरीही बार बंद करण्यास भाग पाडल्याने त्याने बघून घेतो, अशी धमकी मला दिली. त्या वेळी त्याच्या बारमध्ये दारू पिलेल्या तीन ग्राहकांमध्ये भांडणे सुरू झाली. ती भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या संतोष पवार नावाच्या पोलिसावर हल्ला झाला. हल्लेखोराला मी पकडायला गेला असता नवलानी याने मला धरून ठेवले. त्यामुळे एक हल्लेखोर पळून गेला. अधिक पोलिस बळ आल्यानंतर तीन आऱोपी हल्लेखोरांना आम्ही पोलिस ठाण्यात घेऊन आलो. या हल्लेखोरांत प्रसिद्ध हिरेव्यापारी भरत शहा यांचा नातू यश मेहता याचाही समावेश होता. मी त्या आरोपींना पोलिस ठाण्यात आल्यापासून मला अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन सुरू झाले आणि एफआयआर दाखल न करण्यासाठी दबाव येऊ लागला. तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक असलेले परमबीरसिंग यांनीही त्यासाठी प्रचंड दबाव टाकला. मी मात्र गुन्हा दाखल करण्यावर ठाम होतो. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करू नये यासाठी दबाव आणला त्यांच्याही नावांची पोलिस डायरीत एंट्री केली. त्यात परमबीरसिंग यांचेही नाव होते. ते टाकू नये यासाठी तत्कालीन सहायक पोलिस आयुक्तांनी अनेकदा विनंती केली होती. पण तोपर्यंत फिर्याद लिहून झाली होती, असे डांगे यांनी म्हटले आहे. नवलानी, मेहता यांच्याविरोधात फिर्याद दाखल झाल्याने परमबीरसिंग चिडले.

यानंतर हे प्रकरण वाढत गेले. परमबीरसिंग यांनी मला त्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात बोलवले होते. मात्र मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त संजीव बर्वे यांनी मला तेथे न जाण्याचा आदेश दिल्याने मी गेलो नाही. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात परमबीरसिंग हेच मुंबईचे पोलिस आयुक्त झाले. सूत्रे घेण्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी आमचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते आणि तपास अधिकारी किशोर शिंदे यांना  बोलावून घेतले आणि नवलानी याला कसे वाचविता येईल, याबद्दल सूचना दिल्या. तसेच मी सांगेपर्यंत आरोपपत्र दाखल न करण्याचे तोंडी आदेश दिले. इकडे नवलानी मला गावदेवी पोलिस ठाण्यातून हटविण्यासाठी हट्टाला पेटला होता.  त्याच वेळी शार्दूलसिंग बायस नावाचा परमबीरसिंग यांचा जवळचा नातेवाईक असलेला माझ्याकडे आला आणि हे सारे प्रकरण मिटविण्यासाठी परमबीरसिंग यांच्या नावाने त्याने माझ्याकडे 50 लाख रुपयांची मागणी केली. ती मान्य करणे मला शक्य नव्हते आणि योग्यही नव्हते. त्यामुळे माझी बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आणि काही दिवसांन निलंबित करण्यात आले. त्यानंतर पुन्हा बायस मला भेटला आणि त्याने माझे निलंबन रद्द करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली. काही दिवसांनी ही रक्कम एक कोटी रुपये केली, असे डांगे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या साऱ्या संदर्भात आपल्याकडे योग्य पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

नवलानी आणि परमबीरसिंग यांचे व्यावसायिक संबंध कसे आहेत, भरत शहा आणि परमबीरसिंग हे कसे गॅंगस्टरसाठी काम करतात, असे बरेच आरोप डांगे यांनी केले आहेत. आता या प्रकरणाच्या चौकशीत काय निघते, यावरून परमबीरसिंग यांचे भवितव्य ठरणार आहे. 

Related Stories

No stories found.