सीबीआयने महाबळेश्वरच्या बंगल्यात वाधवा बंधूंकडे केला पाच तास तपास - CBI Interogated Wadhva Brothers for Five Hours in Mahabaleshwar | Politics Marathi News - Sarkarnama

सीबीआयने महाबळेश्वरच्या बंगल्यात वाधवा बंधूंकडे केला पाच तास तपास

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 6 मे 2020

प्रसिध्द उदयोगपती धीरज वाधवा व कपील वाधवा हे येस बॅंकेच्या आर्थिक घोटाळयातील आरोपी असुन सीबीआयच्या पथकाने महाबळेश्वर येथील त्यांच्या वाधवा हाऊस या बंगल्यातुन २३ एप्रिल रोजी ताब्यात घेतले. तेव्हा पासुन ते सीबीआय कोठडीत आहेत. सात मे पर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे

महाबळेश्वर:  येस बॅंक आर्थिक घोटाळया प्रकरणी सीबीआय कोठडीत असलेल्या वाधवा बंधु यांच्या तपासासाठी सीबीआयच्या विशेष तपास पथकाने महाबळेश्वर येथील त्यांच्या बंगल्यात हजेरी लावुन तपास केला. या वेळी तपास पथका सोबत वाधवा बंधु हे देखील उपस्थित होते. पाच तास तपास केल्यानंतर वाधवा बंधूंना सोबत घेवुन सीबीआयचे पथक मुंबईकडे रवाना झाले.

प्रसिध्द उदयोगपती धीरज वाधवा व कपील वाधवा हे येस बॅंकेच्या आर्थिक घोटाळयातील आरोपी असुन सीबीआयच्या पथकाने महाबळेश्वर येथील त्यांच्या वाधवा हाऊस या बंगल्यातुन २३ एप्रिल रोजी ताब्यात घेतले. तेव्हा पासुन ते सीबीआय कोठडीत आहेत. सात मे पर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आज त्यांच्या वर असलेल्या आरोपाच्या तपासासाठी सीबीआयचे विशेष तपास पथकाने महाबळेश्वर येथील त्यांच्या बंगल्यावर हजेरी लावली. 

सीबीआयच्या दोन विशेष वाहनातून त्यांना आज दुपारी येथे आणण्यात आले. येथे येण्यापुर्वी येथील स्थानिक पोलिसांना कळविण्यात आले होते. सीबीआयच्या सुचने नुसार दुपारी बारा वाजता स्थानिक पोलिसांचे पथक वेण्णालेक येथे पोहचले. तेथुन सीबीआयच्या पथका बरोबर सर्व येथील वाधवा हाउस येथे पोहचले. तेथे स्थानिक पोलिसांना बाहेर काढुन सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक व त्यांच्या पथकाने तब्बल पाच तास तपास केला. या वेळी बंगल्याची झाडा झडती घेवुन तेथील कागदपत्रांची पाहणी केली. या प्रकरणी पुन्हा वाधवा बंधु यांचे जबाब नोंदविण्यात आले. त्या नंतर सायंकाळी पाच वाजता वाधवा बंधु यांना सोबत घेऊन सीबीआयच्या पथकाने येथील स्थानिक पोलिस ठाण्यात हजेरी लावली. येथील सोपस्कार पुर्ण करून साडेपाच वाजता सीबीआयच्या विशेष तपास पथकाने मुंबईकडे कुच केले.

लोणावळा येथे एका खाजगी बंगल्यात असताना अचानक आठ मार्च रोजी वाधवा कुटुंब हे महाबळेश्वरला आले तेव्हा पासुन ते सीबीआयच्या रडारवर पोहचले. येथील स्थानिक पोलिसांनी देखिल वाधवा यांचेवर काही गुन्हे दाखल केले आहेत. महाबळेश्वर येथे आल्या नंतर वाधवा कुटूंबाला प्रथम जिल्हा प्रशासनाने इन्स्टिटयुशनल क्वारंटाईन केले. त्या नंतर पुन्हा १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले. होम क्वारंटाईनचा कालावधी संपुष्टात येण्या पुर्वीच सीबीआयच्या पथकाने येस बॅंक घोटाळा प्रकरणी धीरज वाधवा व कपील वाधवा यांना चौकशी साठी ताब्यात घेतले व अटक करून मुंबईला नेले. तेव्हा पासुन हे वाधवा बंधु हे सीबीआय च्या कस्टडीत आहेत. 

सीबीआयनंतर ईडी ताब्यात घेण्याची शक्यता

वाधवा बंधु यांची पोलिस कस्टडी ही सात मे रोजी संपुष्टात येत आहे. त्या मुळे उदया वाधवा यांच्या कस्टडीत वाढ होणार की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळणार या कडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान जरी उदया त्यांना पोलिस कोठडी वाढवुन मिळाली नाही तरी त्यांना तातडीने जामीन मिळेल याची शक्यता कमी दिसुन येत आहे. सीबीआय नंतर कदाचित ईडी चे पथक वाधवा बंधु यांना चौकशी साठी ताब्यात घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या मुळे वाधवा बंधूंना जामिनावार सुटण्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख