विरारमध्ये 13 रुग्ण आगीत होरपळून गेले आणि राजेश टोपे म्हणतात ही `नॅशनल न्यूज` नाही - Virar fire incident, not national news says Maharashtra Health Minister Rajesh Tope | Politics Marathi News - Sarkarnama

विरारमध्ये 13 रुग्ण आगीत होरपळून गेले आणि राजेश टोपे म्हणतात ही `नॅशनल न्यूज` नाही

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

राजेश टोपे टिकेचे लक्ष्य

मुंबई : विरार पश्चिममधील विजय वल्लभ रुग्णालयातील कोविड सेंटरला आग लागून 13 जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अवघा देश हळहळत असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे मात्र भलत्याच कारणाने वादात अडकले आहे. विरार येथील दुर्घटना ही ही काही नॅशनल न्यूज नाही, असे ते कॅमेऱ्यासमोर बोलल्याने ते टिकेचे लक्ष्य झाले आहेत.

भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी टोपेंवर टिकेची तोफ डागली आहे. राज्यात निष्पाप लोक होरपळून मरताहेत एकापाठोपाोठ एक अग्नीकांड सुरू आहेत. माणसं हवालदिल झालीत त्यांना आधाराची गरज आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे मात्र विरारमधील घटना”नॅशनल न्यूज”नाही म्हणत जखमेवर मीठ चोळायचं काम करताहेत. किती असंवेदनशीलता मायबाप सरकारची! ही प्रतिक्रीया दुदैवी आहे, असे वाघ यांनी म्हटले आहे.

विरार येथील घटना फार महत्वाची नाही, असे तर टोपे यांना सुचवायचे नाही ना, असा सवाल विचारला जात आहे. किती रुग्ण दगावल्यानंतर ती नॅशनल न्यूज होईल, असेही टोपेंना विचारण्यात येत आहे. राज्यात भंडारा, मुंबई आणि आता विरार या ठिकाणी आगीमुळे रुग्णालयात रुग्ण गमावल्याच्या घटना घडल्या. आॅक्सिजनचा पुरवठा गळतीमुळे ठप्प झाल्याने नाशिकमध्ये 22 रुग्णांचा मृत्यू झाला. या अशा घटनांमुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची दुर्दशा पुढे येत आहे. भंडारा येथील घटनेत बालकांचा मृत्यू झाल्यानंकर सर्व रुग्णालयांचे फायर आॅडिट कऱण्याचा आदेश देण्यात आला होता. तरीही त्यानंतर आगी लागण्याचे प्रकार घडले.

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातीळ अतीदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश  दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. 
ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख