उल्हासनगरच्या कलानी परिवाराची राष्ट्रवादीशी जवळीक वाढली

सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसपासून दूर असलेला कलानी परिवार राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची व महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. २०१७ च्या पालिकेच्या निवडणुकीत निशाणी मिळाली नसल्याने 'टीम ओमी कलानी'च्या उमेदवारांना नाईलाजास्तव भाजपच्या निशाणीवर निवडणूक लढवावी लागली होती
Sharad Pawar- Omi Kalani
Sharad Pawar- Omi Kalani

उल्हासनगर  : उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांनी नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. या भेटीत आगामी राजकीय गणितांची रणनीती ठरवल्याच्या चर्चेला कलानी यांनीच दुजोरा दिल्याने उल्हासनगरातील राजकारणाला आगामी पालिका निवडणुकीत कलाटणी मिळण्याची शक्‍यता आहे. 

सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसपासून दूर असलेला कलानी परिवार राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची व महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. २०१७ च्या पालिकेच्या निवडणुकीत निशाणी मिळाली नसल्याने 'टीम ओमी कलानी'च्या उमेदवारांना नाईलाजास्तव भाजपच्या निशाणीवर निवडणूक लढवावी लागली होती. त्यांचे १५ च्या आसपास नगरसेवक निवडून आले होते. 

ओमी कलानींमुळे भाजपच्या संख्याबळाचे गणित जुळल्याने पंचम कलानी यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली होती; मात्र आमदारकीच्या निवडणुकीत भाजपने उमेदवारीचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे रातोरात ज्योती कलानी-ओमी कलानी यांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधल्यावर कलानी यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, भाजप-शिवसेना युतीचे कुमार आयलानी यांनी त्यांचा पराभव केला.

उमेदवारी नाकारल्याचा वचपा ओमी कलानी यांनी जानेवारीमध्ये पार पडलेल्या महापौर निवडणुकीत काढला. भाजपच्या व्हिपला झुगारून टीम ओमी कलानीच्या १० नगरसेवकांनी शिवसेनेच्या लीलाबाई आशान यांना मतदान केल्याने त्या महापौरपदी विराजमान झाल्या. सध्या उल्हासनगर महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आहे. आगामी पालिका निवडणुकीतही आघाडी कायम राहण्याचे चित्र आहे. ही दूरदृष्टी ठेऊन ज्योती कलानी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. २०२२ च्या निवडणुकीसाठी ही रणनीती मानली जात आहे.

पवार आमचे 'गॉडफादर'
सुप्रिया सुळे यांच्या भेटीसंदर्भात ज्योती कलानी यांच्याशी संपर्क साधला असता, आगामी निवडणुकीत रणनीती ठरवण्यासाठी ही भेट घेतल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. ओमी कलानी यांच्या टीमचे नगरसेवक राष्ट्रवादीत येणार काय, अशी विचारणा केल्यावर शरद पवार हे आमचे 'गॉडफादर' आहेत. ते सांगतील तसे होणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com