उल्हासनगर पालिका स्थायी समिती निवडणूक रंगतदार ठरणार? संख्याबळात भाजप वरचढ - Ulhasnagar Standing Committe Chairman Election will be interesting | Politics Marathi News - Sarkarnama

उल्हासनगर पालिका स्थायी समिती निवडणूक रंगतदार ठरणार? संख्याबळात भाजप वरचढ

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

राजकीय खेळी खेळण्यात कमालीचे तरबेज असलेले पालकमंत्री एकनाथ शिंदे हे कोणती खेळी खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडीला एकही सदस्य नसलेले ओमी कालानी यांच्या डावपेचांची रणनीती कोणती असणार हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

उल्हासनगर  : महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मंगळवारी (ता. २२) निवडणूक होणार आहे. यामध्ये भाजपचे पारडे जड असले, तरी ७ संख्याबळाच्या जोरावर शिवसेना आणि कालानी गट खेळी खेळून सभापतिपद काबीज करण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

भाजप-टीम ओमी कालानी (टीओके) आणि साई पक्ष अशी दीड-दोन वर्षांपूर्वी सत्ता होती. त्या वेळी निशाणी मिळाली नसल्याने टीओकेला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती. भाजपमध्ये अधिकांश नगरसेवक हे टीओकेचे होते. त्या वेळी पंचम कालानी या महापौर व टीओकेचे राजेश वधारिया हे स्थायी समिती सभापती होते; मात्र भाजपने आमदारकीसाठी आश्‍वासन दिल्यावरही पाठ फिरवल्याने ओमी कालानी यांनी मागच्या वर्षी महापौरांच्या निवडणुकीत वचपा काढला. 

१० नगरसेवकांचा पाठिंबा शिवसेनेला दिल्याने शिवसेनेच्या लीलाबाई आशान या महापौर झाल्या. त्यामुळे अवघ्या अडीच वर्षात भाजपला पायउतार व्हावे लागले होते. स्थायी समिती सभापती राजेश वधारियांसोबत काही नगरसेवक भाजपमध्ये राहिले; तर साई पक्षातील एखाद्‌दोन वगळता उर्वरित भाजपमध्ये विलीन झाले. १ एप्रिल रोजी वधारिया यांचा कार्यकाल संपणार होता, पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने निवडणुका थांबवल्याने वधारिया सभापती पदावर कायम राहिले.

अखेर ९ सप्टेंबरला शासनाने स्थायी समितीसह विविध समित्यांच्या निवडणुकीची घोषणा केल्यावर वधारिया यांचा कालावधी संपला. या घडीला स्थायी समितीत शिवसेनेचे ३, राष्ट्रवादी ३ व रिपाइं आठवले ३असे ५; तर भाजपचे जमनादास पुरस्वानी, डॉ. प्रकाश नाथानी, विजय पाटील ३ असे आठ सदस्य असून त्यांचा कालावधी ६ महिन्यांनंतर संपणार आहे. स्थायी समितीच्या सदस्यांची मंगळवारी ऑनलाइन निवडणूक होत आहे, त्यात साई पक्ष हा भाजपमध्ये विलीन झालेला असल्याने भाजप ६ व शिवसेनेच्या ६ सदस्यांची निवड होणार आहे. ९ संख्याबळ असल्याने भाजपचे पारडे जड असून कोणत्याही परिस्थितीत सभापती पद मिळवण्यासाठी माजी मंत्री रवींद्र चव्हाण हे शर्थीचे प्रयत्न करणार आहेत.

एकनाथ शिंदे यांची धास्ती?
राजकीय खेळी खेळण्यात कमालीचे तरबेज असलेले पालकमंत्री एकनाथ शिंदे हे कोणती खेळी खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडीला एकही सदस्य नसलेले ओमी कालानी यांच्या डावपेचांची रणनीती कोणती असणार हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
Edited By  - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख