ठाण्यात महापौर निधीवरून सेना-भाजप आमनेसामने - Tussle Between Shivsena BJP over Mayors Fund | Politics Marathi News - Sarkarnama

ठाण्यात महापौर निधीवरून सेना-भाजप आमनेसामने

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

ठाणे शहरातील अत्यावश्‍यक कामांचे प्रस्ताव निधी नसल्याचे कारण देत थांबविण्यात येत आहेत. दुसरीकडे महापौर निधीतून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करीत कट्टे बांधण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपच्या नगरसेवकांनी केला

ठाणे : ठाणे शहरातील अत्यावश्‍यक कामांचे प्रस्ताव निधी नसल्याचे कारण देत थांबविण्यात येत आहेत. दुसरीकडे महापौर निधीतून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करीत कट्टे बांधण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपच्या नगरसेवकांनी केला. बैठकीत महापौर निधीच्या वापरावरून सेना-भाजपच्या नगरसेवकांत चांगलीच खडाजंगी झाली. 

हे कट्टे बांधून ठाणेकरांच्या पैशांची उधळपट्टी कशासाठी, असा सवालही भाजपच्या नगरसेवकांनी उपस्थित केला.ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक शुक्रवारी (ता. २९) पार पड ली. या वेळी भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी महापौर निधी कशा प्रकारे वापरला जाणे अपेक्षित आहे, असा सवाल केला. सध्या महापौर आपल्या मर्जीतील नगरसेवकांसाठीच जास्तीचा निधी देत असल्याचा आरोप करत याबाबत नियम काय आहे, असा सवाल त्यांनी केला. यावर हा निधी वापरण्याचा अधिकार महापौरांना आहे, तो कसा वापरायचा, कोणाला द्यायचा, हे अधिकारदेखील त्यांचेच असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले; परंतु भाजपच्या नगरसेवकांनी याला नापसंती दर्शवत महापौर निधीतून केल्या जाणाऱ्या कामांवरच थेट आक्षेप नोंदविला.

भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी तर महापौर निधीचा कसा चुकीच्या पद्धतीने वापर सुरू आहे, याचे उदाहरणच सभागृहासमोर मांडले. महापौर निधीतून महत्त्वाची कामे शहरात होणे अपेक्षित असताना शहराच्या विविध भागात १० कोटींचे कट्टे बांधण्याचा घाट घातला जात आहे. हे कट्टे केवळ बसण्यासाठी असणार आहेत; परंतु एका कट्ट्यासाठी २५ लाखांचा खर्च केला जाणार असून त्या ठिकाणी काय सोन्याचा मुलामा लावला जाणार आहे का? असा रोखठोक सवाल त्यांनी केला. 

विशेष म्हणजे शहरातील इतर काही महत्त्वाची अत्यावश्‍यक कामे शिल्लक आहेत, ती कामे व्हावीत यासाठी इतर नगरसेवक प्रयत्न करीत आहेत; परंतु कोरोनामुळे निधी नसल्याचे कारण देत या कामांसाठी निधी नसल्याचे सांगितले जात आहे. अशा वेळी या कट्ट्यांसाठी निधी कसा मिळतो, असा प्रश्नही त्यांनी केला. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक आणखीच संतप्त झाले. महापौरांनी कोणाला, किती निधी द्यायचा हा अधिकार त्यांचा असल्याचे मत स्थायी समितीचे माजी सभापती राम रेपाळे यांनी व्यक्त केले; परंतु भाजपचे नगरसेवक आक्रमक झाल्याने अखेर सभापती संजय भोईर यांनी महापौर निधीच्या खर्चाबाबतचा अधिकार हा त्यांचा असल्याने त्यावर भाष्य करणे अयोग्य असल्याचे सांगत हा विषय थांबविण्याचे आदेश दिले.

प्रसूतिगृहासाठीही निधी नाही!
कोपरीतील कोपरी प्रसूतिगृहासाठी गेल्या दोन वर्षांपासून दहा लाखांच्या निधीची मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी या प्रसूतिगृहातील एका बाजूचा स्लॅबही पडला आहे. त्यासाठी निधी नसल्याचे कारण दिले जात आहे. शहरात इतर ठिकाणीदेखील अशी महत्त्वाची कामे असून त्यासाठी निधी दिला जात नसताना महापौरांच्या वॉर्डात कामांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर कसा झाला, असा सवालही भाजपच्या नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख