मंत्री के. सी. पडवीही कच्च्या गुरूचे चेले नाहीत... पदाला धोका होताच पाठवला हा निरोप! - take my resignation on August 9 or 15 challenges minister Padavi | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्री के. सी. पडवीही कच्च्या गुरूचे चेले नाहीत... पदाला धोका होताच पाठवला हा निरोप!

ज्ञानेश सावंत
सोमवार, 19 जुलै 2021

काॅंग्रेसमध्ये मोठ्या घडामोडींची चिन्हे... 

मुंबई : राज्यात कमकुवत असलेल्या काॅंग्रेसमध्येच सध्या मंत्रीमंडळ फेरबदलाचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे या पक्षात मानापमानाचे आणि आव्हान देण्याचे प्रयोग सुरू झाले आहे. राज्य मंत्रीमंडळातून दोघांना डच्चू मिळण्याच्या चर्चेने आता गंभीर वळण घेतले आहे. काॅंग्रेसमधील या घडामोडींकडे भाजप लक्ष ठेवून आहे. (Congress in trouble over cabinet reshuffle in Maharashtra) 

'राजीनामा हवा असेल तर तो ९ किंवा १५ ऑगस्टला घ्या,‘ अशा शब्दांत काँग्रेसचे नेते आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पडवी यांनी पक्षनेतृत्वाला आव्हान दिले आहे. हे खाते आपल्याकडेच राहील, याची खात्री त्यांनी जाहीरपणे देत आपल्या पदाला धोका नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केेले. दुसरीकडे विदर्भातील तीन मंत्री वेगवेगळ्या कारणांनी टेन्शनमध्ये आहेत. 

सुनील केदारांवर खटला सुरू आहे. नितीन राऊत यांच्या मंत्रीपद टिकविण्यासाठी दिल्लीच्या वाऱ्या सुरू आहेत. विजय वडेट्टीवार रुसून बसले आहेत. त्यामुळे या साऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवत असंतुष्टांना गळाला लावण्यासाठी भाजपने जाळे टाकले आहे

काॅंग्रेसमध्ये पहिल्या टप्प्यांत दोघांचे राजीनामे घेतले जाण्याचा अंदाज आहे. यातच पडवी यांनी स्वतःहून आपल्या राजीनाम्याचा मुद्दा काढून क्रांतिदिन किंवा स्वात्रंत्र्यदिनी मागण्याचे आव्हान पक्षाला दिले आहे. त्यामुळे काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या आहेत.

पटोलेंचे दौरे

पक्ष वाढविण्याच्या हेतुने स्वबळाचा नारा देत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राज्यभर फिरत आहेत. विरोधी पक्ष भाजप आणि आघाडीतील मित्र पक्षातील कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये आणून पक्षाचे, आपले महत्व अधोरेखित करण्याचा पटोले यांचा प्रयत्न आहे. त्याच्या बळावरच मित्रपक्षांनाही ते इशारे देत आहेत. पडवी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसमधील नाराज नेत्यांना आपल्याकडे घेऊन पटोले यांना जशास तसे उत्तर देण्याची विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची व्यूहरचना आहे. त्यातूनच पटोले यांचे समर्थक इलामे यांना भाजपमध्ये घेतले गेले. त्यानंतर आता बड्या नेत्यांसाठी भाजपने फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.

चर्चेतील नावे - पटोले, प्रणिती शिंदे, थोपटे

काँग्रेसच्या दोन कॅबिनेट मंत्र्यांचे राजीनामे घेऊन त्यांच्याजागी नव्या नेत्यांना संधी मिळण्याचा निर्णय अंतिम आहे.
नव्यामध्ये पटोले, आमदार प्रणिती शिंदे आणि संग्राम थोपटे यांची नावे चर्चेत आहेत. या तिघांपैकी एकाला म्हणजे थोपटे यांना विधानसभा अध्यक्षपद, पटोले आणि शिंदे यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा आहे. मात्र, त्याआधीच पडवी यांच्या विधानामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत काँग्रेस आक्रमक होत असतानाच पक्षांतर्गत बंडाळी काँग्रेसला भोवण्याची चिन्हे आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख