कल्याण पंचायत समितीत शिवसेनेची भाजपशी हातमिळवणी; राष्ट्रवादीला ठेंगा

शिवसेनेच्या ५ नगरसेवकांना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश देऊन नगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला शह दिल्याची घटना ताजी आहे. आता त्याची परतफेड म्हणून की काय, शिवसेनेने कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवरच कुरघोडी केली आहे.
Shivsena took help of BJP to defeat NCP Candidate in Kalyan
Shivsena took help of BJP to defeat NCP Candidate in Kalyan

कल्याण : राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र असणारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येते आहे. शिवसेनेच्या ५ नगरसेवकांना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश देऊन नगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला शह दिल्याची घटना ताजी आहे. आता त्याची परतफेड म्हणून की काय,  शिवसेनेने कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवरच कुरघोडी केली आहे. 

शिवसेनेने कल्याण पंचायत समितीत थेट भाजपाशी हातमिळवणी करुन राष्ट्रवादीला काँग्रेसला झटका दिला आहे. नुकतीच कल्याण पंचायत समितीची सभापती आणि उपसभापती पदांची निवडणूक पार पडली. या ठिकाणी भाजपाचे ५, शिवसेनेचे ४, राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक आहेत. राज्यात एकत्रित सत्तेत असल्यामुळे पंचायत समितीत शिवसेना-राष्ट्रवादीचे सभापती-उपसभापती सहज निवडून येतील, असे बोलले जात होते.सभापती आणि उपसभापती पद ही दोन्ही पदे राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचे जवळपास निश्चित झाले होते. 

पण अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी रविवारी राजकीय हालचालींनी वेगळेच वळण घेतले. भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क साधला आणि भाजपाने  शिवसेनेला कुठल्याही शर्तीविना जाहीर पाठिंबा दिला. भाजपाच्या ५ सदस्यांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेच्या अनिता वाकचौरे सात मते मिळवून सभापतीपदी निवडल्या गेल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दर्शना जाधव यांना पाच मते मिळाली. उपसभापतीपदी शिवसेनेचे रमेश बांगर विजयी झाले. त्यांनाही सात मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भरत भोईर यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.

पारनेरमध्ये काय घडलं होतं..

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सत्तास्थापनेसाठी एकत्र येण्याआधीच पारनेरमध्ये या दोन पक्षांनी सत्तेचं गणित जमवले होते. मात्र आता राष्ट्रवादीनं एकहाती सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी अलीकडेच जामखेडमध्ये भाजपाच्या नगरसेवकांना आपल्या ताफ्यात घेतले. त्या पाठोपाठ, पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी सत्तेत सोबत असलेल्या शिवसेनेच्या शिलेदारांना आपल्याकडे ओढून घेतले. शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

दरम्यान, पारनेरच्या पळवापळवीमुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या अखत्यारीत येणारे निर्णय रद्द करण्याचे संकेत दिले आहेत. विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पारनेर प्रकरणी जे झाले ते योग्य नसून चूक सुधारा, असा निरोप शिवसेनेने पाठविला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com