प्रताप सरनाईक यांचे व्याही भाजप नेते.... आता राजकीय सोयरीकही हवीहवीशी!

शिवसेनेकडून भाजपशी युतीबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रियानाही...
PRATAP SARANAIK-PATIL
PRATAP SARANAIK-PATIL

पुणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट भाजपशी युती करण्याचा सल्ला पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्याने खळबळ उडाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने विविध गुन्हे दाखल केल्यानंतर सरनाईक हे प्रचंड तणावाखआली आहेत. त्यांची दोन्ही मुलेही ईडीच्या रडारखाली आल्याने कुटुंबातही ताणतणाव आहेत. सरनाईक यांचे व्याही भाजपचे नेते आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशअवासू समजले जाणारे माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे त्यांचे व्याही आहेत. ठाकरे यांना सल्ला देण्यापूर्वी सरनाईक यांनी आपल्या व्याह्यांचा सल्ला घेतला होता का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.  

गेले शंभर दिवस सरनाईक हे सार्वजनिक कार्यक्रमातून गायब होेते. शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनी ते ठाण्यात 19 जून रोजी दिसले. त्यानंतर थेट त्यांचे पत्र आज 20 जून रोजी व्हायरल झाले. हा त्रास वाचविण्यासाठी भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला त्यांना कुटुंबातून मिळाला नाही ना, अशी शंका आता व्यक्त होत आहे.

दोन मुलगेही राजकारणात

प्रताप सरनाईक यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव विहंग असून धाकट्या मुलाचे नाव पूर्वेश आहे. दोघेही युवासेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे घनिष्ठ संबंध आहेत. पूर्वेश सरनाईक हे युवासेनेचे सचिव असून युवासेनेच्या कामांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होतात. पूर्वेश यांची पत्नी परिशा सरनाईक या ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. त्या प्रभाग क्रमांक २९ चे प्रतिनिधित्व करतात.  त्यांचा मुलगा पूर्वेश याची पत्नी म्हणजे माजी मंत्री रणजित पाटील यांच्या कन्या आहेत. रणजित पाटील हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात गृह आणि नगरविकास राज्यमंत्री होते. सरनाईक आणि पाटील हे दोघे व्याही आहेत. दोन वर्षांपूर्वीच हा विवाह झाला. 

विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष म्हणून प्रताप सरनाईक यांचं नाव १९८९ पासून ठाणे शहरातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये सामील आहेत. विहंग शांतिवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे विहंग रिअल इस्टेटने उभारलेले अनेक रहिवासी प्रकल्प ठाण्यात आहेत. घोडबंदर रोडला मानपाड्याजवळ प्रताप सरनाईक यांचे विहंग्ज इन हे थ्री-स्टार हॉटेलही आहे. विहंग्ज पाम क्लबचीही मालकीही सरनाईक यांच्या विहंग्ज ग्रुपकडे आहे. स्विमिंग पूल, हेल्थ क्लब, जाकूझी आणि स्क्वॅश अशा अत्याधुनिक सोयी या क्लबमध्ये आहेत.

शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईमुळे चर्चेत आले आहेत. गेले काही दिवस तसे ते फोकसमध्ये होतेच. शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ते पुढे येत होते. अर्णव गोस्वामी, कंगना राणावत यांच्याविरोधात बोलणाऱ्या शिवसेनेच्या आघाडीच्या नेत्यांत सरनाईक यांचा समावेश होता.

या सरनाईक यांचा राजकीय, आर्थिक प्रवासही तसा थक्क करणारा आहे. ते महाराष्ट्रात चर्चेत आले ते 2008 च्या सुमारास. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वीस लाख रुपयांचा हिरेजडित मोबाईल त्यांनी भेट दिला होता. त्यामुळे सरनाईक हे उभ्या महाराष्ट्राला माहीत झाले. सिद्धिविनायक गणपतीला भेट मिळालेला हा मोबाईल सरनाईक यांनी लिलावात वीस लाख रुपयांना विकत घेतला होता. त्यांनी तो आपले तेव्हाचे नेते अजितदादांना  सप्रेम भेट दिला. पण अजितदादांनी तेव्हा तो स्वीकारला नव्हता. पण सरनाईक ही मोठे प्रस्थ असल्याचे महाराष्ट्राला दिसून आले.

ठाण्याच्या राजकारणात जितेंद्र आव्हाड यांचे जवळचे मित्र म्हणून तेव्हापर्यंत त्यांची ओळख होती. ती मोबाईल प्रकरणामुळे पुसली आणि सरनाईक यांचा ब्रॅंड तयार झाला. ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरातून ते तीन वेळा पालिकेवर निवडून गेले होते. राज्यात 2009 च्या निवडणुकीत कोळी-माजिवडा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उभे राहणे टाळून त्यांनी शिवसेनेची वाट पत्करली आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या वर्तुळात त्यांचा समावेश झाला. मूळचे वर्धा येथील सरनाईक हे लहाणपणीच डोंबिवलीत आले होते. त्यांचे शालेय शिक्षण हे दहावीपर्यंत झाले. तरुणपणी त्यांनी अनेक व्यवसाय केले. त्यात अंडाभुर्जीची गाडीही डोंबिवलीत ते लावत होते. काही काळ रिक्षाही चालवली. त्यांचे मूळचे आडनाव हे गांडुळे होते. त्यांनी नंतर ते सरनाईक केले. प्रताप सरनाईक यांनी २०१९ साली निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण (स्थावर आणि जंगम एकत्रित) मालमत्ता १२५ कोटींहून अधिक आहे. ठाण्यातील दहीहंडी उत्सवातून ज्यांनी आपले नाव कमावले त्यात सरनाईक यांचा समावेश आहे. त्यांनी `कान्हा` आणि `हृदयांतर` या दोन मराठी चित्रपटांची निर्मितीही केली.

आमदार सांभाळण्याची व्यवस्था

राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठे राजकीय नाट्य झाले. शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतली. त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांना सुरक्षितस्थळी म्हणून दोन-तीन हाॅटेलमध्ये हलविण्यात आले. यासाठीचा खर्च करणाऱ्यांमध्ये सरनाईक यांचा समावेश होता, अशी तेव्हा चर्चा होती. आपल्याला मंत्रीपद मिळेल, या आशेनेच त्यांनी हा खर्च केल्याचे बोलले जात होते. मात्र ते मंत्री झाले नाहीत. मात्र खर्च करणाऱ्यांची यादी विरोधकांनी मिळवली आणि सरनाईक यांच्यावर कारवाई झाली. असे खर्च करणारे शिवसेनेचे आणखी दोन मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे ईडीचा मोहरा वळतो की काय, याची शंका आता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. त्यातील एक मंत्री आहेत. दुसऱ्या नेत्याला सरनाईक यांच्याप्रमाणेच आशेवर थांबावे लागले आहे. हा दुसरा नेता आधीच्या फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होती. ईडीच्या कारवाईने अनेक जण हतबल होतात. या कारवाईतून जामीन मिळणे फार अवघड जाते. अनेक महिने तुुरुंगात काढावे लागतात. सरनाईक यांच्या आधी काॅंग्रेसचे कर्नाटकातील संकटमोचक डी. के. शिवकुमार (यांनीपण एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार वाचविण्यासाठी काॅंग्रेसच्या आमदारांच्या व्यवस्थेसाठी खर्च केला होता.) यांच्यावर ईडीने कारवाई करून अटक केली होती. या कारवाईत लवकर जामीन मिळवणाऱ्यामध्ये शिवकुमार यांचा समावेश आहे. बाकी अनेकांना बरेच दिवस तुरुंगात काढावे लागतात. आता सरनाईक प्रकरणामध्ये काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in