आऊटगोईंगमुळे मनसेत अस्वस्थता; कृष्णकुंजवर बैठक - MNS Senior Leaders upset over Outgoing in Kalyan Dombivali | Politics Marathi News - Sarkarnama

आऊटगोईंगमुळे मनसेत अस्वस्थता; कृष्णकुंजवर बैठक

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

कल्याण डोंबिवली महापालिकेत कालपासून सुरु असलेल्या आऊटगोईंमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी दाखल झाले असून त्यांच्यात व ठाकरे यांच्यात या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे

मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिकेत कालपासून सुरु असलेल्या आऊटगोईंमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी दाखल झाले असून त्यांच्यात व ठाकरे यांच्यात या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

काल राजेश कदम यांनी मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला. आज डोंबिवलीतील मनसेचे माजी विरोधीपक्ष नेते व गटनेते मंदार हळबे भाजपात प्रवेश करत आहेत. दादर पक्ष कार्यलायात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होत आहे. त्यामुळे मनसे नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.  कल्याण-डोबीवली महानगरपालिकेमध्ये मनसेला मोठं भगदाड पडताना पाहायला मिळते आहे. याच अस्वस्थतेतून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, आमदार राजू पाटील कृष्णकुंजवर गेले आहेत.

कल्याण- डोबिवली महानगरपालिकामध्ये राजेश कदम आणि मंदार हळबे मनसेची मोठी ताकद समजली जात होती. भाजपमध्ये प्रवेश करताना आपण कोणत्याही पदाची अपेक्षा केलेली नाही. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर यामध्ये आपल्याला काम करण्याची इच्छा होती. आणि ही इच्छा फक्त भाजपमध्येच पूर्ण होऊ शकते. म्हणून भाजप मध्ये प्रवेश केलेला आहे. मनसे किंवा राज ठाकरे यांच्यावरती कोणतीही आपली नाराजी नाही असं मंदार हळबे यांनी म्हटले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेनेतील इनकमिंग वाढतच आहे. मनसेचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवलीत मनसेला मोठे खिंडार पडले आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच डोंबिवलीचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी सोमवार (ता. १ फेब्रुवारी) रोजी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रवेशाला महत्व दिले. कोणत्याही पदावर नसलेल्या मनसैनिकांना त्यांनी स्वतः शिवबंधन बांधले. डोंबिवलीत शिवसेनेचे ताकद आहे पण तरीही तरुण रक्ताला वाव दिला जाईल, असे सांगत त्यांनी नव्याने प्रवेश करणारांनाही आश्वस्त केले. 

कल्याण- डोंबविली महापालिकेची गेली निवडणूक शिवसेना आणि भाजप यांच्यातील वादामुळे गाजली होती. तरीही शिवसेनेने भाजपपेक्षा काही जास्त जागा जिंकून येथे सत्ता मिळवली. मनसेने येथे आठ-नऊ जागांवर विजय मिळवत आपले अस्तित्व राखले होते. विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील मनसेचा एकमेव आमदार याच भागातून निवडून आला होता. आमदार राजू पाटील यांनी येथे मनसेचे इंजिन राखले. मात्र त्यांच्यात मतदारसंघातील मनसैनिकांनी काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. वर्षा या शासकीय निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. 

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई विरार, भिवंडी या पट्ट्यात शिवसेनेला आपला विस्तार करायचा आहे. त्यासाठीची तयारी तेथील नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यातूनच काल डोंबविलीत मनसेला धक्का देण्यात आला. कदम हे मनसेच्या स्थापनेपासूनचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. तसेच राज ठाकरेंसोबत विद्यार्थी सेनेपासून कार्यरत असल्याने त्यांचे शिवसेनेत जाणे हे धक्कादायक मानले जात आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख