'गाजर पार्टी'ने आम्हाला शिकवू नये; शिवसेनेचा भाजपवर निशाणा

फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवलीसाठी जाहीर केलेल्या ६ हजार ५०० कोटींच्या पॅकेजचा हिशेब द्यावा; मग सरकारवर टीका करावी, असे सांगत शिवसेनेने फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे
Kalyan Dombivli Shivsena Criticized Devendra Fadanavis
Kalyan Dombivli Shivsena Criticized Devendra Fadanavis

कल्याण : कोरोनाच्या आजारावर सर्वतोपरी उपाय करण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले असून राज्य सरकारनेही केंद्राप्रमाणे पॅकेज जाहीर करावे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच व्यक्त केले. यावर फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवलीसाठी जाहीर केलेल्या ६ हजार ५०० कोटींच्या पॅकेजचा हिशेब द्यावा; मग सरकारवर टीका करावी, असे सांगत शिवसेनेने फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

नुसते पॅकेज जाहीर करून काम होत नाही, तर ठाकरे सरकार प्रत्यक्षात योग्य रीतीने व प्रामाणिकपणे काम करत असून भाजप विविध पॅकेज जाहीर करून नागरिकांना गाजरच देत आले आहे. त्यामुळे गाजर पार्टीने आम्हाला शहाणपण शिकवू नये, असे सांगत शिवसैनिकांनी भाजपचा समाचार घेतला.

पॅकेजची घोषणा होऊन चार वर्षे उलटली

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दमदार भाषण करत शहरांच्या विकासासाठी ६ हजार ५०० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र या घोषणेला आता चार वर्षे उलटून गेली असून पॅकेजची घोषणा म्हणजे केवळ गाजर असल्याची टीका सेनेच्या गोटातून होऊ लागली आहे.

तत्कालिन मुख्यमंत्र्यांची घोषणा भाजपच्या अंगलट

फडणवीस यांनी आपल्या भाषणात या पॅकेजमधून रस्ते सुधारणा, जल आणि मलनिस्सारण, आरोग्य, रेल्वेस्थानकांचा विकास, ई-गर्व्हनन्स, प्रदूषण नियंत्रण, गरिबांसाठी घरे, उद्याने आणि मैदाने आदी सोयीसुविधांद्वारे शहरांमध्ये विकास केला जाईल, असे स्पष्ट केले होते. आता ही घोषणा स्थानिक भाजप नेत्यांच्या अंगलट येत असून सेनेने पुन्हा या पॅकेजचा विषय छेडत भाजपवर तोफ डागली आहे.

केवळ पॅकेज जाहीर करून जनतेला गाजर देणारा आमचा पक्ष नाही. भाजपने कल्याण डोंबिवलीसाठी जाहीर केलेल्या पॅकेजचा एक रुपयाही आला नाही. गाजर पार्टीने शिवसेनेला सल्ला देऊ नये. शिवसेना पक्ष प्रत्यक्षात काम करणारा आहे. केवळ मार्केटिंग करणारा नाही - महेश गायकवाड, नगरसेवक, शिवसेना

मेट्रो व इतर विकासकामे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून निधी भाजपने दिला आहे. ही कामे पाहिले तर पॅकेजचा हिशोब देण्याची गरज नाही. कामांचे श्रेय घेण्यास सेना बॅनरबाजी करते. ६ हजार ५०० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले तेव्हा सेनेनेही श्रेय घेतले होते - मोरेश्वर भोईर, भाजप, नगरसेवक.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com