महिला सरपंचांच्या कामात यापुढे पतींची लूडबूड चालणार नाही - The work of women sarpanches will no interfered with by their husbands | Politics Marathi News - Sarkarnama

महिला सरपंचांच्या कामात यापुढे पतींची लूडबूड चालणार नाही

जनार्दन दांडगे
बुधवार, 14 जुलै 2021

पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये नातेवाईकांनी मुळीच बसता कामा नये, असेही सरकारी आदेशात म्हटले आहे. 

उरुळी कांचन (जि. पुणे) : महिला सरपंचांच्या कामात त्यांचे पती सर्वत्र सर्रासपणे लूडबूड करताना दिसतात. पण, यापुढे त्यांच्या कामात त्यांचे पती अथवा इतर नातेवाईकांचा हस्तक्षेप चालणार नाही. शिवाय, संबंधित पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात त्यांच्या नातेवाईकांना बसताही येणार नाही, असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. या निर्णयामुळे सरपंच असलेल्या पत्नीच्या कारभारात आता पतीराजांची ढवळाढवळ चालणार नाही. (The work of women sarpanches will no interfered with by their husbands)
 
हवेली पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, सदस्य सचिन धुमाळ यांनी गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांच्याकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल घेत सरकारने वरील आदेश दिला आहे. नव्या आदेशामुळे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य या पदाधिकाऱ्यांनी त्यांची कामे स्वतः करणे गरजेचे आहे. 

हेही वाचा : आंबेगावातून शिवसेनेचा आमदार निवडून येऊ शकत नाही, हा आपल्यावर लागलेला डाग

गावचा कारभारी म्हणून सरपंचांचा लौकिक असतो. सरपंचांचा त्याच्या गावांत वेगळाच तोरा असतो. एक वेगळाच सन्मान असतो. मात्र, महिला सरपंच असल्यास कामकाजामध्ये बऱ्याचदा त्यांच्या पतीचा अथवा इतर नातेवाईकांचा हस्तक्षेप कायम असतो. या संदर्भातच  बडेकर, सचिन धुमाळ यांनी ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सरकारने वरील आदेश दिला आहे. पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये नातेवाईकांनी मुळीच बसता कामा नये, असेही सरकारी आदेशात म्हटले आहे. 

दरम्यान, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या नातेवाईकांकडून कामात हस्तक्षेप झाल्याचे आढळून आल्यास संबंधित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्याविरुद्ध मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३९ (१) अन्वये चौकशीनंतर विभागीय आयुक्तांना कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. 

यासंदर्भात तक्रारदार आणि हवेली पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर म्हणाल्या की, हल्ली ग्रामपंचायतीमध्ये साधारण २० ते २५ लोक बसलेले असतात. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जातात. तसेच, ग्रामपंचायत सभागृहात सरपंच आणि सदस्य सकाळी गप्पा मारत बसले की ते दुपारीच उठतात. अशा वेळी कोणत्याही नागरिकाची किंवा महिलेची तेथे या सगळ्यांना समोरे जाताना घुसमटच होते. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनास वारंवार सांगून देखील दुर्लक्ष केले जात हेाते. बऱ्याचदा ग्रामपंचायत महिला सदस्यांचे पतीराज येथे विराजमान असतात. ग्रामपंचायत कामकाजामध्ये ग्रामपंचायत महिला सदस्यांचे योगदान दिसत नव्हते. पण नव्या निर्णयामुळे त्याला चाप बसेल. 

पत्नीचे कामकाज पाहणाऱ्या पतींवर कारवाई होणार

महिला सक्षमीकरण व्हावे, या उद्देशाने जिल्हा तालुका आणि गावपातळीवर महिला आरक्षण लागू केले आहे. जिल्हा परिषद महिला सदस्य या स्वतः कार्यालयात जाऊन कामकाज पाहतात. त्याप्रमाणे ग्रामपंचायत महिला सदस्यांनी देखील ग्रामपंचायत प्रशासनाचे कामकाज पाहावे. त्यांचे कामकाज त्यांचे पती पाहत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असे हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख