हाथरस जिल्ह्यातील एका पिडित दलित युवतीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणी उत्तरप्रदेशातील योगी सरकार बॅकफूटवर गेले आहे. यूपी पोलिसांच्या अब्रुचे धिंडवडे निघाले आहेत. जर तसे धिंडवडे निघाले नसते तर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह काही पोलिसांवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निलंबनाची कारवाई केलीच नसती. ज्याप्रकारे पोलिसांनी हे प्रकरण हाताळले त्यांने प्रत्येक भारतीयांने संताप आणि राग व्यक्त केला.. ज्या मुलीवर अत्याचार झाले. त्या मुलीचा मृतदेह तिच्या गावात आणण्यात आणल्यानंतर तिच्या आईवडिलांच्या परवानगीने अंत्यसंस्कार व्हायला हवे होते पण, तसे झाले नाही. यूपी पोलिसांनी दादागिरी केली. दडपशाही करीत त्या पिडित युवतीवर अंत्यसंकार केले मात्र, तिच्या आईवडिलांना आपल्या पोटच्या गोळ्याचा चेहराही पाहू दिला नाही. त्या अभागी मुलीच्या आईने फोडलेला हंबरडा ऐकताना देशातील प्रत्येक माणसाचं मन सुन्न झालं.
या सर्व प्रकारानंतर देशातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी योगी सरकारवर टीकास्त्र सोडले. या गावात जावून पिडित मुलीच्या आईवडलांना भेटावे. तिचे सांत्वन करावे असे कोणालाही वाटणे स्वाभाविक होते. ही भावना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची झाली असेल तर ते चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. भले मंत्री स्मृती इराणी कितीही म्हणोत की यामध्ये राहुल राजकारण करीत आहेत. राहुल यांनी हाथरसमधील पिडित मुलीच्या गावात जाण्याची परवानगी मागितली मात्र पोलिसांनी गेल्या गुरूवारी त्यांना परवानगी दिली नाही.
उलट 144 कलम लागू असल्याचे कारण दिले. त्यांचा अवमान केला. ते एका राष्ट्रीय पक्षाचे बडे नेते आहेत. खासदार आहेत. हे माहित असूनही त्यांना धकाबुक्की केली. त्यांना खाली पाडले. हे देशाला पाहवले नाही. हा कुठला न्याय आहे अशा प्रतिक्रिया माध्यमांमध्ये उमटल्या. एका दलित पिडित मुलीच्या आईवडीलांचे सांत्वन करण्यासाठी जावू दिले जात नाही. अपमान होतो. दादागिरी केली जाते म्हणून राहुल चिडले नाहीत. संतापले नाहीत. त्यांनी सौजन्याने पोलिसांना काही प्रश्न केले. मला एकट्याला जावू द्या. मी एकटा चालत जातो असे सांगूनही पोलिसांनी दादागिरी केली. आपला खाक्या काही सोडला नाही.
आता हे कोणाच्या इशाऱ्यावरून झाले हे सांगण्याची गरजही नाही. समजा गेल्या गुरूवारी एकट्या राहुलना पाठविले असते तर काय बिघडले असते. त्यांनी जावून पिडित युवतीच्या नातेवाईकांची भेट घेऊन चर्चा केली असती आणि ते जे काही म्हणाले ते माध्यमांसमोर आले असते. इतका आंकडतांडव आणि अडवणूक करण्याची यूपी पोलिसांना काहीच गरज नव्हती.
गेल्या गुरूवारी जावू दिले नाही म्हणून राहुल प्रियंका स्वस्थ बसले नाहीत. एक दिवसमध्ये जावून दिला आणि आज त्यांनी निर्धार केला की जगातील कोणतीही शक्ती मला पिडित मुलीच्या गावात जाण्यापासून रोखू शकत नाही. तेथे जाण्यासाठी राहुल हे जिद्दीला पेटले होते. खरेतर यूपी सरकारने आज शहानपणा करून पत्रकारांना आणि राहुल गांधींना परवानगी दिली ते बरेच झाले. समजा राहुल अडूनच बसले असते. त्यातून त्यांनी कूच करण्याचा प्रयत्न केला असता, पक्षांचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जर संघर्ष उडाला असता तर वेगळेच वळण लागले असते. त्यामुळे योगी सरकारने विशेषत: पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे.
काही झाले तरी आपला देश लोकशाहीप्रधान आहे. येथे हुकुमशाही चालत नाही, चालणार नाही. राहुल गांधी यांनी आज योगी सरकारला वाकविले आहे ते ही लोकशाहीपद्धतीने. त्यामुळे राहुल जिंकले योगी सरकार हरले असा याचा अर्थ काढावा लागेल. आज रात्री सव्वा आठच्या सुमारास राहुल प्रियंकांनी पिडित युवतीच्या आईवडील आणि भावांशी पंचवीस मिनीटे चर्चा केली. यावेळी प्रियंका गांधींना अश्रू अनावर झाले होते. काय बोलावे आणि काय नको असे झाले होते. पण काहीही असो पिडित मुलीच्या नातेवाईकांच्या भेटीनंतर या दोन्ही बहिणभावंडांच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसले त्यांची शब्दात तुलना करता येत नाही.
कारण प्रियंका आणि राहुल यांनी आपले पिता राजीव गांधी यांची झालेली हत्या अनुभवली होती. ज्यावेळी हत्या झाली त्यावेळी त्यांचे वय तरी काय होते. तसेच आजी इंदिरा गांधीींची हत्या त्याना चांगलीच ठावूक आहे. प्रियंका-राहुल भावनाविवश झाले हे जगाने पाहिले.
खरेतर प्रियंका-राहुल यांचे कौतुक करताना येथे दुसरा एक प्रश्न पडतो की यूपीत भाजपचे सरकार आहे. भाजपवाले ऊठसूठ साधनसुचितेचा आव आणतात. मग देशाला हादारा देणारी घटना घडूनही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ किंवा राज्याचे गृहमंत्री किंवा भाजपचे उत्तरप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष पिडित मुलींच्या आईवडीलांना तातडीने का नाही भेटले. की यातही राजकारण आहे. जर ठरविले असते तर मुख्यमंत्री जावू शकले असते. राहुल-प्रियंका जातात तर योगींना अशक्य असे काहीच नव्हते. जर ते गेले असते तर वातावरण निवळले असते. संपूर्ण देशाला एकच प्रश्न पडला आहे, की असे योगी पिडित मुलीच्या आईवडीलांना का भेटले नाहीत. याचं उत्तरही तेच देऊ शकतात. असो.
येथे राहुल गांधी यांच्यावर दुसऱ्याबाजूने टीका होत आहे, की पश्चिम बंगाल, राजस्थानमध्ये बलात्काराच्या अशाच गंभीर घटना घडल्या आहेत. यापूर्वी महाराष्ट्रात कोपर्डीची घटना घडली. भोतमांगेचे प्रकरण घडले. काही महिन्यापूर्वी कोकणात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाले. तेव्हा राहुल गांधी कुठे होते. हा प्रश्नही योग्यच आहे. त्यांनी अशा ज्या देशाला हादरा देणाऱ्या घटना घडतात त्याविरोधात आवाज उठविला पाहिजे. राजस्थानात कॉंग्रेसचे सरकार आहे म्हणून तेथे जायचे नाही हे योग्य नाही. अशा घटनांची दखलही त्यांनी घ्यायला हवी. आज 35 खासदारांसह शेकडो कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या गर्दीत ते हाथरस जिल्ह्यातील त्या पिडित मुलीच्या घरी गेले. सांत्वन केले हे चांगलेच झाले पण, याचे अनुकरण पुढेही त्यांनी देशात जर अशा घटना घडल्या तर करावे हीच अपेक्षा.
यूपीमध्ये भाजपचे सरकार आहे म्हणून राहुल, प्रियंका आक्रमक होतात असा संदेश जाणेही योग्य नाही. कोणतीही महिला, युवती असो ती कोणत्याही जातीपातीची असो राहुल आणि प्रियंका गांधीनीच नव्हे प्रत्येक राजकीय नेत्यांनी आपला आवाज बुलंद केला पाहिजे. पक्ष, राजकारण न पाहता हाथरसप्रकरणी राहुल गांधींनी जो आवाज उठविला. बलाढ्या अशा भाजप नेत्यांना खंबीरपणे तोंड दिले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. गेल्या चार दिवसातील घडामोडींकडे एक दृष्टिक्षेप टाकल्यास असे लक्षात येते की, राहुूलबाबा तुम्ही जिंकलाच. सत्ताधिशांविरोधात लढता आहात. शेवटी एकच म्हणावे लागेल, की निकोप लोकशाहीसाठी विरोधीपक्षाची ताकदही म्हणूनच महत्वाची असते.

