धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर : शरद पवार यांचे सूचक वक्तव्य - will dhananjay munde resign is the question | Politics Marathi News - Sarkarnama

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर : शरद पवार यांचे सूचक वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 14 जानेवारी 2021

राजकीय घडामोडी वेगवान झालेल्या आहेत...

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचे स्वरूप गंभीर आहे. माझ्या पक्षाच्या सर्व वरिष्ठ सदस्यांना याबाबत विश्वासात घेणार आहे. या सर्व वरिष्ठ सदस्यांची मते जाणून घेऊन याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ. पक्ष आणि पक्षप्रमुख म्हणून आम्ही काळजी घेऊ, असे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री नवाब मलिक यांच्या जावयावर सरकारी यंत्रणेने कारवाई केली आहे. वैयक्तिक मलिक यांच्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

या साऱ्या प्रकारामुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. याबाबत काही वृत्तवाहिन्यांनी तसे वृत्त दिले आहे. तसे काही घडल्यास येत्या काही तासांत राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

मुंडे यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. हा गुन्हा दाखल व्हावा यासाठी संबंधित तरुणी ही पोलिस ठाण्यामध्ये गेली आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्य भाजपने या तरुणीला साथ देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या हे पोलिस ठाण्यात जाणार आहेत. मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता त्यामुळे नाकारता येत नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरवर झाली.

त्यानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंडे यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यातून त्यांच्यावर आरोप होतील, असे त्यांना वाटले असावे. त्यामुळे ते आधीच उच्च न्यायालयात गेले होते. त्यांनी त्यांची बाजू मला सांगितली. त्यांनी जे मला सांगितले ते माझ्या सहकाऱ्यांना मी सांगेल आणि त्यानंतर निर्णय घेऊ, असे पवार यांनी स्पष्ट केले.

ही बातमी वाचा ः `ललिताकुमारी`मळे धनंजय मुंडे अडचणीत येऊ शकतात

जयंत पाटील म्हणतात नो काॅमेंटस

या प्रकरणाची निरपेक्षपणे चौकशी व्हावी असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मांडले.

आज प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आले असता माध्यमांनी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्या विषयावर त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते.  मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत जे चर्चिले जात आहे त्यामध्ये जावयाने केलेल्या घटनेला म्हणजे ती केली आहे की नाही हे चौकशीत कळेल परंतु सासर्‍यावर परिणाम होण्याची आवश्यकता नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. सध्या दोन्ही विषयात राजीनाम्याची आवश्यकता नाही. तशी परिस्थिती नाही. त्या परिस्थितीचा योग्य तो आढावा योग्य त्या स्तरावर घेण्यात येईल. मंत्रीमंडळात फेरबदल होण्याची आवश्यकता नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख